चंद्रभागा प्रकल्पाच्या पाईपला गळती, धरणाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:17+5:302021-04-06T04:12:17+5:30

पान ३ ची लिड अचलपूरचा पाणीपुरवठा खंडित होणार, पर्यायी व्यवस्था करण्याचे नगरपालिकेला निर्देश अनिल कडू परतवाडा : चंद्रभागा प्रकल्पातून ...

Chandrabhaga project pipe leak, dam threat | चंद्रभागा प्रकल्पाच्या पाईपला गळती, धरणाला धोका

चंद्रभागा प्रकल्पाच्या पाईपला गळती, धरणाला धोका

पान ३ ची लिड

अचलपूरचा पाणीपुरवठा खंडित होणार, पर्यायी व्यवस्था करण्याचे नगरपालिकेला निर्देश

अनिल कडू

परतवाडा : चंद्रभागा प्रकल्पातून अचलपूर नगर परिषदेला पाणी पोहचविणाऱ्या पाईपला गळती लागली आहे. या पाईपला तब्बल तीन ठिकाणी लीकेज आहे. हे लीकेज वेळीस दुरुस्त न केल्यास भविष्यात धरणाला धोका संभवत असल्यामुळे पाण्याकरिता पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाने अचलपूर नगर परिषदेला दिले आहेत.

धरणातून निघालेल्या लाईनमधून पाणी कालव्यात सोडले जाते. या कालव्यातून हे पाणी अचलपूर नगर परिषद पाणीपुरवठा योजनेकरिता घेते. अचलपूर-परतवाडा शहराचा पाणीपुरवठा यावर अवलंबून आहे. अचलपूर नगर परिषदेने धरणातून पाणी घेण्याकरिता पर्यायी व्यवस्था वेळेत केली नाही, तर अचलपूर-परतवाडा शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित होणार आहे. केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेअंतर्गत २००७-०८ मध्ये अचलपूर-परतवाडा शहराकरिता चंद्रभागा धरणावरील वाढीव पाणीपुरवठा योजना मान्य केली गेली. ४० कोटींच्या या योजनेवर जवळपास ७७ कोटी खर्च केले गेले. पुढे अमृत योजना आली. या अमृत योजनेतूनही कोट्यवधी रुपये नव्याने खर्च केले गेले. पण, या अमृतचा शहरातील घोळ आजही जसाच्या तसा आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेसह अमृत योजनाही शहरवासीयांना सक्षम पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्या आहेत. अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील पाणी वितरण व्यवस्थाच कोलमडली आहे.

पालिकेकडून दुर्लक्ष

अचलपूर-परतवाडा शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेकरिता चंद्रभागा धरणावर ९.१६१ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले गेले. यातील ६.१५० दलघमी पाण्याचा वापर नगर परिषदेने सुरू केला. या ६.१५० दलघमी पाण्यासोबतच १.५० दलघमी वाढीव पाण्याचा प्रस्ताव नगरपालिकेकडून पाटबंधारे विभागाकडे सादर करण्यात आला आहे. पण, पाणी वितरण व्यवस्थेतील पाईप लाईनवरील मोठ्या गळत्या नगर परिषदेकडून वषार्नुवर्षे आजही दुर्लक्षित आहेत.

बॉक्स २

अशी आहे पाटबंधारे विभागाची अडचण

चंद्रभागा मध्यम प्रकल्पावरील सेवा द्वार, आपत्कालीन द्वार व ओपन कन्ड्यूटमधील पेन स्टोक पाईपचे एक्पांशन जॉईट व सॅडल सपोर्ट आदी दुरुस्ती व देखभालीचे काम पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाला करावयाचे आहे. याकरिता यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता ग.म. गंटावार व त्यांची अधिनस्थ यंत्रणा, पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख व त्यांच्या अधिनस्थ यंत्रण यांनी चंद्रभागा प्रकल्पाला भेटीही दिल्या.

चंद्रभागा मध्यम प्रकल्पावरील सेवा द्वाराच्या सुरुवातीला असणाऱ्या मुख्य कालव्यापासून अचलपूर नगर परिषदेला पाणीपुरवठा केला जातो. सेवा द्वार व आपत्कालीन द्वार तसेच कन्ड्यूट पाईप यांची दुरुस्ती करतेवेळी कालव्यात पाणी सोडणे पाटबंधारे विभागाला शक्य नाही. दुरुस्ती करतेवेळी मुख्याकडील भाग हा पाणीपुरवठा खंडित करून कोरडा ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे थेट जलाशयातून पाईप लाईनद्वारे पाणी घेण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याचे निर्देश नगर परिषदेला पाटबंधारे विभागाकडून डिसेंबर २०२० मध्ये दिले गेले आहेत. पण, याकडे अचलपूर नगर परिषदेने दुर्लक्ष चालविले आहे, तर पाटबंधारे विभागाला ती दुरुस्ती या एक-दोन महिन्यात करणे गरजेचे आहे.

कोट

पर्यायी व्यवस्था करण्याचे पत्र पाटबंधारे विभागाकडून तीन महिन्यांपूर्वी प्राप्त झाले. पण पर्यायी व्यवस्था करणे शक्य नाही. तसे पत्र अचलूपर नगरपरिषदेकडून पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.

-मिलींद वानखडे, अभियंता, नगर परिषद, अचलपूर

Web Title: Chandrabhaga project pipe leak, dam threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.