१३ सप्टेंबर रोजी तुरळक पावसाची शक्यता
By Admin | Updated: September 10, 2016 00:12 IST2016-09-10T00:12:17+5:302016-09-10T00:12:17+5:30
यंदाच्या मोसमात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सध्य पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

१३ सप्टेंबर रोजी तुरळक पावसाची शक्यता
हवामानाचा अंदाज : बळीराजाला प्रतीक्षा
अमरावती : यंदाच्या मोसमात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सध्य पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मात्र १३ सप्टेंबर रोजी तुरळक, तर १५ सप्टेंबरनंतर सर्वत्र पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पावसाने गत महिन्याभरापासून दडी मारल्याने शेतकरी पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करु लागला आहे. खरीप हंगामातील मूग बाजारात विक्रीसाठी दाखल झाला असला तरी अवेळी पडलेल्या पावसामुळे मुगाचे पीक खालावल्याचे चित्र आहे. पाऊस गायब झाल्यामुळे पाण्याअभावी सोयाबीन पीक ‘कोमात’ गेले आहे. या आठवड्यात सोयाबीन पीकाला पाणी मिळाले नाही, तर यंदा सोयाबीन उत्पादनात कमालीची घट होईल, असा अंदाज शेतकरी सुरेश मोलके यांनी वर्तविला आहे. पाण्याअभावी सोयाबीन पिवळे पडत असून शेतकरी वरुण राजाची आतुरतेने वाट बघत आहे. दरवर्षी गणेशोत्सवात पावसाचे आगमन राहते. परंतु यंदा गणेशोत्सव प्रारंभ होऊन पाच दिवसांचा कालावधी लोटला असताना पावसाचा अजूनही पत्ता नाही. मात्र येत्या २४तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून मध्यप्रदेशात चक्रकार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे १२ सप्टेंबरपासून पावसाचे वातावरण तयार होण्यास हे वातावरण पोषक ठरणारे आहे. पावसासाठी वातावरण सुधारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. १३ सप्टेंबर रोजी तुरळक तर १५ पासून सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
वातावरणात प्रचंड बदल झाला आहे. येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार होण्याचे संकेत आहेत. तसेच मध्यप्रदेशात चक्राकार वारे वाहू लागल्याने पावसासाठी वातावरण तयार होत आहे. १३ सप्टेंबर रोजी तुरळक तर १५ सप्टेंबरपासून पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
- अनिल बंड,
हवामानतज्ज्ञ, अमरावती