‘विशाखा’समोर सिद्धतेचे आव्हान

By Admin | Updated: May 24, 2017 00:12 IST2017-05-24T00:12:27+5:302017-05-24T00:12:27+5:30

महापालिकेतील कर्मचारी महिलेचा ‘मानसिक छळ’ प्रकरणात विशाखा समितीसमोर निष्कर्षाच्या सिद्धतेचे आव्हान राहणार आहे.

Challenge of Siddha challenge before 'Vishakha' | ‘विशाखा’समोर सिद्धतेचे आव्हान

‘विशाखा’समोर सिद्धतेचे आव्हान

‘सदार’ प्रकरण : बुधवारी महापालिकेत बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेतील कर्मचारी महिलेचा ‘मानसिक छळ’ प्रकरणात विशाखा समितीसमोर निष्कर्षाच्या सिद्धतेचे आव्हान राहणार आहे. यासंदर्भात २४ मे रोजी ‘विशाखा’ समितीची बैठक होवू घातली आहे. राजापेठ उड्डाण पूल प्रकल्पाच्या विवक्षित कामाची जबाबदारी असलेल्या जीवन सदार या सेवानिवृत्त अभियंत्याच्या बाबतीत हे प्रकरण आहे.
आयुक्तांनी याबाबत १६ मे रोजी काढलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमिवर या फाईलवरील धुळ नव्याने झटकली गेली आहे. विशाखा समितीनेही दखल घेतल्याने संबंधित महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळण्याचे सुसंकेत आहेत.
आयुक्तांच्या आदेशानुसार, अतिरिक्त शहर अभियंता या पदाचा प्रभार असलेल्या जीवन सदार यांच्याविरूद्ध संबंधित महिलेला फौजदारी करण्याची मुभा मिळाली आहे. तथापि या प्रकरणातील पुरावे हेतुपुरस्सरपणे नाहीसे करण्यात आले. या विशाखा समितीच्या भाष्यावर आयुक्तांनी समिती अध्यक्षांकडून खुलासा मागितला आहे. यासंदर्भात उपायुक्त प्रशासन महेश देशमुख यांच्या स्वाक्षरीने १९ मे रोजी समिती अध्यक्षांना पत्र देण्यात आले असून त्यांना प्रशासनाकडे खुलासा द्यायचा आहे. सीसीटीव्ही फुटेज हेतुपुरस्सरपणे नाहीसे करण्यात आले. अन्य सर्व दिवसांचे फुटेज सामान्य प्रशासन विभागात उपलब्ध असताना नेमके २० ते २६ मे २०१६ या कालावधीतील रेकॉर्ड उपलब्ध नव्हते. यावरून हेतुपुरस्सरपणे ते रेकॉर्ड नष्ट करण्यात आले, असा निष्कर्ष समितीने काढला आहे.बांधकाम विभागातील ते फुटेज असल्याचे समितीचे म्हणणे आहे. याबाबत आता नव्याने जीएडीला विचारणा केली जाणार असून त्या विशिष्ट दिवसांचेच रेकॉर्ड उपलब्ध नसल्याबाबत जीएडीकडून खुलासा मागवला जाईल. याशिवाय टेलिफोनिक संवादही नव्याने तपासला जाईल. आयुक्तांच्या आदेशानंतर या चौकशीने वेग घेतला आहे. शिवाय कारवाईत ढवळाढवळ केल्याचा आरोप असलेल्या बांधकाम विभागातील ‘त्या’ कनिष्ठ लिपिकाची चौकशीही प्रस्तावित केली जाणार आहे. एकंदरीतच या प्रकरणाची फाईल नव्याने उघडण्यात आल्याने विशाखा समितीसमोर त्यांनीच काढलेल्या निष्कर्षाची सिद्धता करण्याचे आव्हान आहे. विशाखा समितीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित महिलेला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

त्यांची बदली का?
जीवन सदार यांनी आपला मानसिक छळ चालविल्याची तक्रार एका महिलेने मार्च २०१६ मध्ये केली होती. विशाखा समितीची चौकशी सुरू असतानाच ‘त्या’ महिलेची अन्य विभागात बदली करण्यात आली. या प्रकरणातील गैरअर्जदारावर कुठलीही कारवाई न करता उलटपक्षी फिर्यादी महिलेवर बदलीची कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबंधित प्रकरणाबाबत खुलासा मागविणारे पत्र मला प्राप्त झाले. यासंदर्भात बुधवारी विशाखा समितीची बैठक होवू घातली आहे. त्यात भाष्य व खुलाशाबाबत चर्चा होईल.
- सुषमा ठाकरे,
अध्यक्ष, विशाखा समिती

Web Title: Challenge of Siddha challenge before 'Vishakha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.