स्पिडगनच्या उपयोगितेचे पोलिसांसमोर आव्हान
By Admin | Updated: December 15, 2015 00:17 IST2015-12-15T00:17:32+5:302015-12-15T00:17:32+5:30
वाहनांच्या वेगावर अंकुश लावण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने स्पिडगन शहरात आणल्या.

स्पिडगनच्या उपयोगितेचे पोलिसांसमोर आव्हान
वेगमर्यादा दर्शक बोर्डांचा अभाव : वाहनांच्या वेगावर अंकुश बसविण्याचे प्रयत्न
अमरावती : वाहनांच्या वेगावर अंकुश लावण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने स्पिडगन शहरात आणल्या. त्याच्या वापरासाठी आता पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र, शहरात वाहनांची गती मोजण्यासाठी थेट मार्ग नाहीत. तसेच अद्यापपर्यंत बहुतांश मार्गांवर वेगमर्यादा दर्शविणारे बोर्ड नसल्यामुळे स्पिडगनचा उपयोग होणार तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील बहुतांश मार्ग ५० ते १०० मीटरच्या आतील असून त्यानंतर वळण मार्ग आहेत. स्पिडगनचा वापर करताना संबंधित पोलीस कर्मचारी वेगवान वाहनावर लक्ष्य साधून वेगाचे मोजमाप करणार आहे. शहरात वेगवान वाहने दररोज चालतात. मात्र, ते वाहन १०० मीटर अंतरादरम्यानच वळण घेतात. त्यामुळे स्पिडगनचा वापर करताना वाहनाकडे लक्ष्य साधणे हे एक मोठे आव्हान पोलीस विभागासमोर निर्माण होणार आहे. एखादे वाहन १ किलोमिटरपर्यंत वेगाने चालत असेल तरच स्पिडगनद्वारे वाहनाकडे लक्ष्य वेधणे शक्य होऊ शकते. तेव्हाच वाहनाचा वेग व वाहन क्रमांकाचे छायाचित्र काढले जाऊ शकते. जर ते वाहन ५० मीटरच्या आतच वळण घेत असेल तर काही क्षणात त्या वाहनाकडे लक्ष्य साधले गेले पाहिजे. तेव्हाच स्पिडगन पोलीस विभागासाठी उपयोगी ठरणार आहे. शहरात अमरावती-बडनेरा, पंचवटी-पॉवर हाऊस व एमआयडीसी बायपास मार्ग हे तीनच मुख्य आणि थेट मार्ग आहेत. या मार्गाची लांबी सरळ दिशेने असल्यामुळे याच मार्गावर स्पिडगनचा उपयोग होऊ शकतो, असे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत मार्गांवर वाहनांच्या वेगाचे मोजमाप करणे व त्या वाहनांवर कारवाई करणे हे पोलीस विभागासमोर आव्हानच ठरणारे आहे. (प्रतिनिधी)
शहरातील अंतर्गत मार्गावर अनेक ठिकाणी वळणे आहेत. त्यामुळे स्पिडगनद्वारे 'टार्गेट' शोधणे कठीणच होणार आहे. स्पिडगनचा उपयोग सरळ दिशेने जाणाऱ्या मार्गावर होऊ शकतो. स्पिडगनच्या वापरासाठी मार्गदेखील निश्चित करावे लागणार आहेत. सद्यस्थितीत पोलिसांचा सराव सुरू आहे.
- नीलिमा आरज,
पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.