गुन्हे शाखेसमोर ‘स्वच्छतेकडून समृद्धीकडे’ जाण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 00:06 IST2016-01-08T00:06:59+5:302016-01-08T00:06:59+5:30
‘टीप’ प्रकरणाचे तत्कालिक कारण असो की, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश, ठपका कुठलेही असो पोलीस आयुक्तांनी गुन्हेशाखेत मोठा फेरबदल केला आहे.

गुन्हे शाखेसमोर ‘स्वच्छतेकडून समृद्धीकडे’ जाण्याचे आव्हान
नखशिखांत बदल : पाटलांकडे नव्या दमाचे सवंगडी
अमरावती : ‘टीप’ प्रकरणाचे तत्कालिक कारण असो की, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश, ठपका कुठलेही असो पोलीस आयुक्तांनी गुन्हेशाखेत मोठा फेरबदल केला आहे. पोलीस निरीक्षकांपासून कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करीत गुन्हे शाखेत नव्यांची वर्णी लागली. टीप प्रकरणाने ‘दाग’दार झालेल्या गुन्हे शाखेत नखशिखांत बदल करुन आयुक्तांशी ‘स्वच्छता’ अभियानच राबविल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया मग वर्तुळात उमटली.
पोलिस निरीक्षक आत्राम, उपाध्यायसह १० पोलिस कर्मचाऱ्यांची बदलीला स्वच्छेताचा नामानिधान दिल्यास ‘दिलीप पाटलांच्या नेतृत्वातील गुन्हे शाखेला आता ‘डिटेक्शनरुपी’ समृद्धीकडे जाण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
विधिमंडळ अधिवेशन संपल्याबरोबर पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी धाडसी निर्णय घेत संशयास्पद वागणुकीचा ठपका ठेवत गुन्हे शाखेतील १० पोलिसांना ‘मुख्यालयाशी संलग्न केले. त्याचबरोबर पोलिस डिजीटल प्रमेश आत्राम आणि सहायक पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांचा आयुक्तालयातच अन्यत्र बदल्यांचे आदेश काढलेत. शहर कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटिल यांच्याकडे गुन्हे शाखेचा ‘भार’ सोपविण्यात आला. त्यासोबत दोन सहायक पोलिस निरीक्षक आणि दो उपनिरीक्षकांना गुन्हे शाखेत स्थानांतरित केले. अगदी नखशिखांत नवीन टीम गुन्हे शाखेला मिळाली. पोलिस आयुक्तांनी विश्वास उर्थवित गुन्हे शाखेत ‘एन्ट्री’ दिलेल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांवर आता काहीतरी ‘करुन’ दाखविण्याचे आव्हान आहे.
ट्रक टिप प्रकरणाने गुन्हे शाखेची पोलिस वर्तुळासह समाजातही मोठी बदनामी झाली होती. त्यानंतर अख्खी गुन्हेशाखाच बदलून टाकत आयुक्तांनी गुन्हे शाखेत ‘नवागडी - नवा राज’ हे सूत्र अवलंविले.
वरली मटका, जुगारासह अन्य गुन्हेगारीवर अंकुश राखण्याचे अजस्त्र आव्हान आता दिलीप पाटील यांना पेलावे लागणार आहे. ‘डिटेक्शन’ हा गुन्हे शाखेचा आत्मा मानला जातो. शहराच्या विविध पोलिस ठाण्यातर्गत येणाऱ्या अवैध धंद्यावर अंकुश राखण्याची मोठी जबाबदारीही गुन्हे शाखेवर असते. दिलीप पाटिल यांनी आपली टीम निवडतांना शहर कोवालीतील काही सहकाऱ्यांना सामावून घेतले आहे. शहराचा क्राईम गु्रप वाढत चालल्याची ओरड, चेन स्नॅचर आणि मोबाईल, दुचाकी चोरट्यांनी उभे केलेले आव्हान, अशा विविध पातळ्यांवर पाटील यांच्या नेतृत्वातील गुन्हे शाखेला स्वच्छतेकडून समृद्धीकडे मार्गक्रमण करावयाचे आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून गुन्हे शाखेचा बाज बिघडला होता. त्यातच टिप प्रकरणाने रयाच बिघडून गेली. शहरात फ्रेजरपुरासह अन्यही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांनी डोके वर काढले. मात्र त्यावर अंकूश ठेवण्यात तत्कालिन गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी अयशस्वी ठरले. त्या पार्श्वभूमिवर पाटील यांच्या नेतृत्वातील गुन्हे शाखेवर मोठी मदार आहे. डिटेक्शनवर भर देवून क्राईम ग्राफ खाली आणण्याचे आव्हान आहे.