बेलोऱ्याच्या अभिमन्यूने भेदले अचलपूरचे चक्रव्यूह
By Admin | Updated: October 25, 2014 02:02 IST2014-10-25T02:02:33+5:302014-10-25T02:02:33+5:30
लोकशाहीचा राज्यस्तरीय पंचवार्षिक सण नुकताच पार पडला. यात राजकीय पक्षांच्या ‘दुकानदाऱ्या’ आणि मतदार त्यांचे ‘ग्राहक’ असतात.

बेलोऱ्याच्या अभिमन्यूने भेदले अचलपूरचे चक्रव्यूह
सुरेश सवळे चांदूरबाजार
लोकशाहीचा राज्यस्तरीय पंचवार्षिक सण नुकताच पार पडला. यात राजकीय पक्षांच्या ‘दुकानदाऱ्या’ आणि मतदार त्यांचे ‘ग्राहक’ असतात. ग्राहकांना आपल्याकडे वळविण्याचे कसब शासकीय धुरंदर पार पाडतात. हे कसब ज्यांना जमले तो यशस्वी झालाच म्हणून समजा. अशातच विविध पक्षांनी रचलेल्या चक्रव्युहात एका अपक्ष उमेदवाराने तिसऱ्यांदा विधानसभेत धडक दिली. अचलपूर विधानसभा मतदारसंघाने रचलेला हा विक्रमच म्हणावा लागेल.
बच्चू कडू हे एक अजब रसायन आहे, हे राज्याचे तत्कालीन गृहमंत्र्यांनी उच्चारलेले वाक्य त्यांच्या या विजयामुळे तंतोतंत खरे ठरले. अचलपूरची रचना तशी आगळी वेगळी आहे. या मतदारसंघात बहुजन जातींचे प्राबल्य असले तरी कोणत्याही एका जातीच्या भरवशावर कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही, हे यापूर्वीच्या अनेक निवडणुकीतून दिसून आले आहे. एका जातीचे पाठबळ असले तरी विविध जातींच्या ‘टेक्या’शिवाय उमेदवार यशस्वी होऊ शकत नाही, हे यापूर्वीच्या अनेक निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.
अचलपूर मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. यात काँग्रेस, भाजप, बसपा सारख्या राष्ट्रीय पक्षाचे तर शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाइं सारख्या राज्यस्तरावरील पक्षाचेही उमेदवार होते. याशिवाय अपक्षांचा भरणासुद्धा बऱ्यापैकी होता. या दिग्गजांच्या चक्रव्यूहाला भेदणे कोणत्याही अपक्ष आणि राजकीय पक्षाचे पाठबळ नसलेल्या बच्चू कडू यांना शक्य होणार नाही, असाच समज काही राजकीय समीक्षकांनीही व्यक्त केला होता. त्यातही मोदी लाटेत आता बच्चू कडू पार वाहून जाणार, असे चित्र होते. परंतु कडूंच्या पारड्यात वाढलेली मुस्लीम मतदारांची टक्केवारी जमेची बाजू ठरली. मतदारसंघातील इतर उमेदवारांप्रमाणे त्यांच्याही सभा, रॅली झाल्या. यात त्यांचे बळ दिसत होते. दोनदा आमदार असूनही ते शेवटपर्यंत जमिनीवरच राहिले. गेल्या दोन निवडणुकीत बच्चू कडूंना ज्या-ज्या नेत्यांनी मदत केली ते यावेळी स्वत:च रिंगणात असल्यामुळे बच्चुंच्या विजयाची कोणीही शाश्वती देत नव्हते. स्वत: बच्चू कडू, त्यांचे कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांशिवाय सगळेच त्यांच्या ‘हॅटट्रिक’विषयी शंका-कुशंका व्यक्त करीत होते.
२१ फेरींच्या मतमोजणीतही उत्कंठा वाढतच होती. १५ व्या फेरीच्या अखेरीस भाजपचा उमेदवार १८६४ मतांनी आघाडीवर होता तर काँग्रेसचा उमेदवार बसपाच्या उमेदवारापेक्षाही दोन हजारांनी माघारला होता. १६ व्या फेरीअखेर कडू केवळ २४५ मतांनी पुढे होते. ही आघाडी २१ व्या फेरीअखेर १० हजार १७० वर पोहोचली आणि ‘कलंदर’ बच्चू कडूंचा ‘चमत्कार’ लोकांना अनुभवता आला. अचलपूर आणि परतवाड्यात बसपाने घेतलेली मते अनुक्रमे १२०१२ व ४९५९ तर काँग्रेसच्या उमेदवाराने घेतलेली मतांमधील तफावत पाहता हे मतदान बच्चू कडूंच्या पथ्यावर पडले.
हाकेला ‘ओ’ देणारा, सतत संपर्कात राहणारा उमेदवार असल्याने बच्चूंना म्हणूनच लोकांनी तिसऱ्यांदा उचलून धरले आणि तो ठरला निवडणुकीचे चक्रव्यूह भेदणारा ‘अभिमन्यू’. अचलपूर येथील ही निवडणूक ऐतिहासिक ठरली ती याच कारणामुळे.