जयश्रीला न्याय देण्याची महिला आयोग अध्यक्षांची ग्वाही
By Admin | Updated: July 31, 2016 00:02 IST2016-07-31T00:02:26+5:302016-07-31T00:02:26+5:30
एक दिवसीय अमरावती दौऱ्यावर आलेल्या राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजता इर्विनमध्ये दाखल असलेल्या जयश्री दुधेच्या प्रकृतीची आत्मियतेने चौकशी केली.

जयश्रीला न्याय देण्याची महिला आयोग अध्यक्षांची ग्वाही
पोलिसांची बैठक घेणार : सासरच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन
अमरावती : एक दिवसीय अमरावती दौऱ्यावर आलेल्या राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजता इर्विनमध्ये दाखल असलेल्या जयश्री दुधेच्या प्रकृतीची आत्मियतेने चौकशी केली. जयश्रीच्या सासरच्या मंडळीवर कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. या प्रकरणासंदर्भात माहूर पोलिसांची बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पतीच्या मृत्यूनंतर कुऱ्हा येथील माहेरवासिनी जयश्री दुधेवर माहूर येथील सासरच्या मंडळींनी अनन्वीत अत्याचार केलेत. इर्विन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्तातून पाठपुरावा केल्यानंतर ती वार्ता राज्यभरात पसरली. जयश्रीच्या अत्याचाराला वाचा फुटल्याने प्रशासकीय यंत्रणेने दखल घेतली. शुक्रवारी राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी जयश्री दुधेला भेट दिली. तिची विचारपूस करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करू तसेच नांदेड येथील पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून सासरच्या मंडळीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी जयश्रीला दिले. राज्य महिला आयोगातर्फे या अत्याचार प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात करून न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही रहाटकर यांनी जयश्रीसह तिच्या कुटुंबीयांना दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक तितरे, अधिसेविका मंदा गाढवे, भाजपाचे दिनेश सुर्यवंशी, जंयत डेहनकर यांच्यासह सुरेखा लुंगारे, सुधा तिवारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
समाजसेवी मनीष पोकळे घेतोय काळजी
समाजसेवेच्या उद्देशाने शहरातील मनीष पोकळे नामक युवक जयश्रीची काळजी घेण्यासाठी सरसावला आहे. तो दररोज इर्विनमध्ये जाऊन जयश्री व तिच्या आई-वडिलांना भेट घेऊन मदतीचा हात देत आहे. त्यांना काही लागल्यास तत्काळ मदत देत आहे.