खुर्ची एक, कर्मचारी दोन !

By Admin | Updated: March 29, 2017 00:11 IST2017-03-29T00:11:49+5:302017-03-29T00:11:49+5:30

महापालिकेचा अधिकृत क्रीडाधिकारी कोण, याबाबत प्रशासनात एकवाक्यता नसल्याचे उघड झाले आहे.

Chair one, two employees! | खुर्ची एक, कर्मचारी दोन !

खुर्ची एक, कर्मचारी दोन !

महापालिका : क्रीडाधिकाऱ्याची संगीत खुर्ची
अमरावती : महापालिकेचा अधिकृत क्रीडाधिकारी कोण, याबाबत प्रशासनात एकवाक्यता नसल्याचे उघड झाले आहे. हजेरीपत्रकावर दोघे जण क्रीडाधिकारी म्हणून स्वाक्षरी करीत असल्याने महापालिकेतील प्रशासकीय दिरंगाईचे प्रदर्शन झाले आहे. परस्परांच्या अनुपस्थितीत दोघेही एकाच खुर्चीवर बसत असल्याने खरा क्रीडाधिकारी कोण, असा प्रश्न क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांना पडला आहे. हेमंत पवार यांच्या कार्यकाळात हा प्रकार होत असल्याने प्रशासकीय शिस्त विस्कटल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
तत्कालीन प्रभारी क्रीडाधिकारी प्रवीण ठाकरे यांची झोन क्र.५ मध्ये बदली होऊनही त्यांनी दांडगाई चालविल्याने हा पेचप्रसंग उद्भवला आहे. प्रशासनाने याबेकायदेशीर प्रकाराबद्दल ‘मौन’धारण केल्याने क्रीडाधिकारीपदाची संगीतखुर्ची झाली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा कुठलाही वचक नसल्याचे ठाकरे-देशमुखांमधील द्वंदाने जाहीर झाले आहे. ९ फेब्रुवारीच्या आदेशानंतर चंद्रकांत देशमुख क्रीडाधिकारीपदावर अधिकृतरीत्या रूजू झाले. तथापि क्रीडाधिकारीपद प्रचंड आर्थिक स्वारस्याचे असल्याने ठाकरे यांनी हा आदेश फेटाळला. निवडणूक काळात आयुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू शकत नाहीत, अशी हाकाटीही पिटली. मात्र, काहीच साध्य न झाल्याने ते वैद्यकीय रजेवर निघून गेले. दरम्यान फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात चंद्रकांत देशमुख क्रीडाधिकारी म्हणून रुजू झाले. मात्र ‘चिपकू’ ठाकरेंनी खुर्ची सोडली नाही. आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशाला आपल्या लेखी फारसे महत्त्व नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. १ ते १० मार्च व ११ ते २२ मार्च याकाळात आपण वैद्यकीय रजेवर होतो, असे ठाकरे सांगतात. या संपूर्ण कार्यकाळात चंद्रकांत देशमुख यांनी क्रीडाधिकारी म्हणून ‘चार्ज’ घेतला, स्वाक्षऱ्या केल्या व फाईल्सही हाताळल्या. मध्यंतरी सेटिंग बिघडल्याने ठाकरे २३ मार्चला क्रीडाधिकारी पदावर अनधिकृतपणे रूजू झाले. याबाबत त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला कोणतीही माहिती दिली नाही. डोंगरे यांच्या कार्यकाळात आपल्याला कायमस्वरूपी पदभार मिळाला, अशा अविर्भावात ठाकरे यांनी आयुक्त पवार यांच्यासह अख्ख्या यंत्रणेलाच आव्हान दिले आहे.

काढा ना 'आॅर्डर'!
प्रवीण ठाकरे या वरिष्ठ लिपिकावर प्रशासनाचे एवढेच प्रेम असेल तर खुशाल त्यांना क्रीडाधिकारीपद द्या. मात्र त्यापूर्वी ९ फेब्रुवारीला काढलेला त्यांच्या बदलीचा आदेश रद्द करून सुधारित आदेश तर काढा, असे राजरोसपणे बोलले जात आहे. कुठल्याही आदेशाविना ठाकरे हे क्रीडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर अनधिकृतपणे बसले असून त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.

वस्तुत: क्रीडा विभागच बंद करीत आहे. क्रीडाधिकारीपदाच्या वादावर बुधवारी योग्य तो निर्णय घेऊ
- हेमंत पवार, आयुक्त

बुधवारी याबाबत आयुक्तांकडून माहिती घेवू. बदली आदेश फेटाळणे सुसंगत नाही. त्याबाबत प्रशासनाला सूचना देवू.
- संजय नरवने, महापौर

Web Title: Chair one, two employees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.