बच्चू कडूंचा वीज कंपनीला ‘शॉक’
By Admin | Updated: June 24, 2016 00:37 IST2016-06-24T00:37:19+5:302016-06-24T00:37:19+5:30
तालुक्यातील सर्वच विभागांचा योजनानिहाय आढावा घेण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी स्थानिक तहसील कार्यालयात ....

बच्चू कडूंचा वीज कंपनीला ‘शॉक’
आढावा बैठक गाजली : कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्याच्या सूचना
चांदूरबाजार : तालुक्यातील सर्वच विभागांचा योजनानिहाय आढावा घेण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी स्थानिक तहसील कार्यालयात विभाग प्रमुखांना बुधवार २२ जून रोजी बोलावले होते. या बैठकीत उपस्थित शेतकरी व नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या ‘फेस टू फेस’ तक्रारी दाखल केल्यामुळे आमदारांनी वीज कंपनीची अक्षरश: झाडझडती घेतली.
तक्रारकर्त्यांची कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देष देऊन संबंधित कत्राटदारावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची सूचनाही वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. २० मिनटे वीज कंपनीला धारेवर धरल्यामुळे आ. कडू यांनी वीज कंपनीचे सर्किट ‘शॉट’ केल्याचे दिसून आले.
तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या विद्युत जोडणीसाठी अर्ज दिले आहेत. परंतु त्यांना अजूनपर्यंत वीज जोडणी देण्यात आली नाही. सुरळी येथील राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याला त्वरित वीज जोडणीकरिता कंत्राटदाराकडून पैशाची मागणी झाली. त्याप्रमाणे संबंधी शेतकऱ्याने सहा हजार रुपये नगदी कंत्राटदारास दिले. पुन्हा ७ हजार रुपयाची मागणी कंत्राटदाराने केली. या प्रकरणात आ. कडू यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांच्याकडे कोणतेही उत्तर उपलब्ध नव्हते.
विविध विभागांचा विभाग नहाय आढावा घेताना शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जाच्या प्रकरणाबाबत उपनिबंधकांच्या वेळकाढू धोरणाचा समाचार घेतला. शासन शेतकऱ्यांना सावकारीच्या जोखडातून सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना तुम्ही शेतकऱ्यांची बाजू शासनासमोर का मांडत नाही, असा प्रश्न करून उपनिबंधकांना आमदारांनी नि:शब्द केले. या बैठकीला तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. त्यांच्या विकास कामांबाबतच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन आमदारांनी यावेळी सरपंचांना दिले. तसेच ग्रामपंचायत हद्दीत येणारे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा ठराव ग्राम पं. घेऊन त्याची प्रत पंचायत समिती व प्रहार कार्यालयाकडे पाठवावी, असे सूचित केले. या बैठकीला तहसीलदार शिल्पा बोबडे, नायब तहसीलदार गजानन पाथरे, हरीश राठोड, सैफन नदाफ यांचेसह वीज कंपनीचे सहायक अभियंता चुटे, जलयुक्त शिवारचे अभियंता पाटील, कृषी अधिकारी बिजवे, गटविकास अधिकारी कनाटे, पंचायत समिती उपसभापती राजेश सोलव, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब वाकोडे, मंगेश देशमुख व दीपक भोंगाडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)