आठवड्यातून दोन दिवस मिळणार अपंगांना प्रमाणपत्र
By Admin | Updated: June 25, 2014 23:33 IST2014-06-25T23:33:27+5:302014-06-25T23:33:27+5:30
जिल्ह्यात विविध ठिकाणी नोंदणी करण्यात आलेल्या सुमारे ७२ हजार अपंगांपैकी ३३ हजार अपंग व्यक्तींना अद्यापपर्यंत प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या अपंगांना त्वरित प्रमाणपत्र देण्यासाठी आता

आठवड्यातून दोन दिवस मिळणार अपंगांना प्रमाणपत्र
अमरावती : जिल्ह्यात विविध ठिकाणी नोंदणी करण्यात आलेल्या सुमारे ७२ हजार अपंगांपैकी ३३ हजार अपंग व्यक्तींना अद्यापपर्यंत प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या अपंगांना त्वरित प्रमाणपत्र देण्यासाठी आता आठवड्यातून दोन दिवस हा उपक्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अपंग कल्याण पुनर्वसन समितीच्या त्रैमासिक बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
जिल्ह्यातील १४ तालुक्यात व शहरात सुमारे ७२ हजार अपंग महिला व पुरुष आहेत. या अपंगांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत अपंगांचे प्रमाणपत्र दिल्या जाते. मात्र यासाठी महिन्यातून एकदाच हा उपक्रम राबविण्यात येतो. परिणामी ही प्रक्रिया संथगतीने होत असल्याचा मुद्दा अपंग कल्याण व पुनर्वसन समितीचे सदस्य किशोर बोरकर यांनी या बैठकीत मांडला. जिल्हाधिकाऱ्यांनीही आठवड्यातून दोन दिवस हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय मंजुर करण्यात आला. जिल्हा परिषदेचा अपवाद वगळता महापालिका व नगरपालिकेत अपंगांसाठी तरतूद केली नसल्याची बाबही बोरकर यांनी समितीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिली. अखेर महापालिका व नगरपरिषदेला अपंगांच्या तरतुदीसाठी पत्रव्यवहार करुन निधीची तरतूद करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिले. यावेळी अपंगांच्या इतरही मागण्यांवर सविस्तर चर्चा करुन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीला सीईओ अनिल भंडारी, रामसिद्धभट्टी, डीएचओ बनकर, राठोड, भाऊराव चव्हाण, अधिकारी पिपरे, समन्वय समितीचे सदस्य किशोर बोरकर, रामराव पोकळे, राजेंद्र देशमुख आदी उपस्थिती होते.