सीईओंना नगरसेवकाकडून धक्काबुक्की
By Admin | Updated: October 9, 2016 01:04 IST2016-10-09T01:04:08+5:302016-10-09T01:04:08+5:30
एलईडी दिवे लावण्याचा कंत्राट न मिळाल्याने मोर्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी नगरसेवकाने धक्काबुक्की ..

सीईओंना नगरसेवकाकडून धक्काबुक्की
मोर्शीतील घटना : एलईडी दिवे लावण्याचा कंत्राट न मिळाल्याने गोंधळ
मोर्शी : एलईडी दिवे लावण्याचा कंत्राट न मिळाल्याने मोर्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी नगरसेवकाने धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या दालनात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.
मोर्शी पोलिसांनी याप्रकरणी नगरसेवक आप्पा गेडाम यांना अटक केली आहे. त्यांच्यासह अन्य तिघांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आप्पा गेडाम हे मोर्शीचे आमदार अनिल बोंडे यांचे कट्टर समर्थक आहेत.
पोलीस सुत्रानुसार, शनिवारी मोर्शी नगरपरिषदेमध्ये आगामी निवडणुकीसंदर्भात बैठक सुरु होती. मुख्याधिकारी महेश वाघमोडे कक्षात बसून मतदार यादी संदर्भात कामकाज करीत होते. दरम्यान दुपारच्या सुमारास स्वीकृत नगरसेवक जितेंद्र ऊर्फ आप्पा गेडामसह त्यांचे तीन सहकारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शिरले.
आमच्या मर्जीतील माणसाला एलईडी दिवे लावण्याचा कंत्राट का दिला नाही, असे म्हणून गेडाम यांनी मुख्याधिकाऱ्यांशी वाद घातला. शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यावर अंगावर धावून जात मारहाणीचा प्रयत्न देखिल केला. या घटनेची तक्रार मुख्याधिकाऱ्यांनी मोर्शी पोलिस ठाण्यात दिली आहे. मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आप्पा गेडामसह तिघांविरुध्द भादंविच्या कलम ३५३, ३२३, ४४७, ५०४, १८६, ५०७, ४२७, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. याच प्रकरणाच्या अनुषंगाने आप्पा गेडाम यांनीही मुख्याधिकाऱ्यांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी शिवीगाळ करून आपल्याला त्यांच्या कार्यालयातून हाकलून लावल्याचे गेडाम यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याधिकारी वाघमोडेंविरुध्द भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. मागील आठवड्यात आप्पा गेडाम यांचे नेते आ. अनिल बोंडे यांनी नायब तहसीलदारांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्या घटनेची शाई वाळते न वाळतेच त्यांच्याच कट्टर समर्थकांनी थेट मुख्याधिकाऱ्यांवरच हल्लाबोल केल्याने राजकीय वर्तुळासह प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
नगरसेवकाने आपल्या सहकाऱ्यांसोबत मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून मारहाणीचा प्रयत्न केला. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून आप्पा गेडाम यांना अटक करण्यात आली आहे.
- नंदकिशोर शर्मा, ठाणेदार, मोर्शी
आम्ही निवडणुकीच्या कामाने मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात गेलो होतो. मात्र, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आमची तक्रार केली आहे, म्हणुन तुमचे काम करणार नाही, असे म्हणून त्यांनी 'गेट आऊट' म्हटले आणि बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शाब्दिक वाद झाला.
- आप्पा गेडाम, नगरसेवक.
एलईडीचा २.२ कोटींचा कंत्राट आमच्या माणसाला का दिला नाही?, असे म्हणून आप्पा गेडाम यांनी वाद घातला आणि अंगावर धाव घेत मारहाणीचा प्रयत्न केला. महिन्याभरापासून ते धमक्या देत आहेत.
- महेश वाघमोडे,
मुख्याधिकारी, मोर्शी नगरपरिषद.
सोमवारी कामबंद
नगर परिषद मुख्याधिकारी संघटना व कर्मचारी संघटनेच्यावतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी ते कामबंद आंदोलन करणार आहेत.