२५० संगणक परिचालकांना डच्चू, सीईओंची कारवाई
By Admin | Updated: December 27, 2014 00:41 IST2014-12-27T00:41:09+5:302014-12-27T00:41:09+5:30
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये विविध ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या ८५३ पैकी सुमारे २५० कंत्राटी संगणक परिचालकांना कामावरुन कमी करण्याबाबतचा प्रस्ताव ...

२५० संगणक परिचालकांना डच्चू, सीईओंची कारवाई
अमरावती : जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये विविध ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या ८५३ पैकी सुमारे २५० कंत्राटी संगणक परिचालकांना कामावरुन कमी करण्याबाबतचा प्रस्ताव सीईओंनी महाआॅनलाईनकडे सादर केल्यामुळे कंत्राटी संगणक परिचालक संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये डाटा एन्ट्री संगणक परिचालक म्हणून संग्राम (महाआॅनलाईन) या कंपनीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील १२ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. ग्रामपंचायतीमध्ये संग्राम कक्षात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना नियमित वेतन देण्यात यावे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, गणवेश पुरविण्यात यावे, संग्राम कक्षात लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करावा, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचारी सध्या संपावर आहेत. यासाठी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व शासन स्तरावर विविध आंदोलने केली. मात्र या आंदोलनाची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
राज्यमंत्र्यांनी लेखी स्वरुपात ठोस निर्णय घेण्याची भूमिका कळविली आहे. त्यामुळे तूर्तास संप कायम असून निर्णयानंतर कामावर रुजू होणार होतो. मात्र सीईओंनी केलेली कारवाई ही राज्यमंत्र्यांच्या आदेशाची अवहेलना करणारी आहे. त्यामुळे या विरोधात आता न्यायालयात दाद मागू.
अमोल वाडी
जिल्हाध्यक्ष, परिचालक संघटना
जिल्ह्यातील संग्राम कक्षाची प्रगती समाधानकारक नाही. कारवाईचा मुद्दा हा महाआॅनलाईनच्या अंतर्गत आहे. कामात प्रगती नसल्याने या कर्मचाऱ्यांची बिनपगारी करुन तसा प्रस्ताव आपण संबंधितांना दिला आहे.
अनिल भंडारी
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती.