माध्यमिक शिक्षणाची कमांड सीईओंकडे
By Admin | Updated: January 8, 2017 00:13 IST2017-01-08T00:13:09+5:302017-01-08T00:13:09+5:30
जि.प. माध्यमिक शिक्षण विभागातील ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार आता सीईओंकडे देण्यात आले आहे.

माध्यमिक शिक्षणाची कमांड सीईओंकडे
सक्षम प्राधिकारी : शासनाचे निर्देश
अमरावती : जि.प. माध्यमिक शिक्षण विभागातील ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार आता सीईओंकडे देण्यात आले आहे. शिक्षण आयुक्तांच्या आदेशाने त्यांना आता सक्षम प्राधिकारी घोषित केले आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार जि.पमधूनच चालतो. मात्र कारवाईचे अधिकार शिक्षण संचालकांकडे होते. त्यामुळे एखादे प्रकरण घडण्यास सीइओंंना केवळ प्रस्ताव पाठवावा लागत होता. त्यामुळे जि.प.त असतानाही या अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने माध्यमिक विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांत अधिक मोकळीक होती. याउलट जि.प. सभागृहात माध्यमिक शिक्षण विभागातील कारभारासाठी सीईओंना जबाबदार धरले जात असे. शिक्षण आयुक्तांच्या आदेशामुळे आता सीईओंकडे माध्यमिक विभागाची कमांड आली आहे. या विभागातील कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी आता सीईओ हेच सक्षम प्राधिकारी आहेत. (प्रतिनिधी)
या अधिनियमाने होणार शिस्तभंगाची कारवाई
मुख्य कार्यपालन अधिकारी यांना ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९च्या नियम ८च्या अनुषंगाने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. कारवाई केल्यानंतरचा अहवाल शिक्षण आयुक्त व शालेय शिक्षण विभागास सादर करावयाचा आहे.