सेंट्रल वेअर हाऊसमध्ये शेतकऱ्यांचे धान्य भिजले
By Admin | Updated: August 8, 2015 00:24 IST2015-08-08T00:24:13+5:302015-08-08T00:24:13+5:30
सेंट्रल वेअर हाऊसमध्ये ठेवण्यात आलेले शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे धान्य छत गळत असल्याने खराब होत आहे.

सेंट्रल वेअर हाऊसमध्ये शेतकऱ्यांचे धान्य भिजले
व्यवस्थापकाची मग्रुरी : जिल्हाधिकाऱ्यांची फटकार, विम्याचा लाभ द्या
अमरावती : सेंट्रल वेअर हाऊसमध्ये ठेवण्यात आलेले शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे धान्य छत गळत असल्याने खराब होत आहे. व्यवस्थापकाने शेतकऱ्यांनाच चोर ठरवून पोलीस ठाण्यात तक्रार केली. शेतकऱ्यांनी भाजपा नेत्या निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकाला चांगलेच फटकारले.
शेतमालास भाव नाही, तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शेतकरी व व्यापाऱ्यांनी सेंट्रल वेअर हाऊसमध्ये सोयाबीन, गहू, हरभरा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून डिपॉझिट ठेवला व कर्जाची उचल केली. वेअर हाऊस द्वारा १० रुपये प्रतिमाह, प्रति पोते भाडे आकारते. सद्यस्थितीत या गोदामात ४० हजार पोते डिपॉझिट आहे. मात्र व्यवस्थापक व ठेकेदार यांना काळजी घेतली नसल्याने हजारो धान्याचे पोते पावसाने खराब झाले. धान्य सडत आहे, हरभरा, गव्हाला कोंब फुटत आहे, शेतकरी त्यांचे धान्य गोदामात पाहावयास गेले असता गोदामात धान्य भिजून खराब होत असल्याचे निदर्शनास आले. गोदामात पाणी साचले आहे. हे निदर्शनात येताच त्यांनी वेअरहाऊसच्या व्यवस्थापकाला जाब विचारला. त्यांनी कुठलाही प्रतिसाद न देता शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांनाच धमकावून त्यांची तक्रार पोलिसात केली. याविषयी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना वेअर हाऊसचे व्यवस्थापक आर.एन. मीना यांना खडसावले. शेतकऱ्यांच्या धान्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. यावेळी गिरीश अग्रवाल, रोहित जालान, अमित अग्रवाल, अशोक सिंघानिया, संजय खट, किशोर शर्मा, राम ददगाळ, सुजित जाजू, गौरव मुंदडा, गजानन ठाकरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाडे आकारणी करीत असताना शेतकऱ्यांच्या धान्याची काळजी घेण्याची जबाबदारी वेअरहाऊसची आहे. धान्य ठेवत असताना विमा काढला जात असल्याने शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळायला पाहिजे व मग्रूर व्यवस्थापकावर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्र्यांना केली.
- निवेदिता चौधरी, प्रदेश सचिव, भाजपा.
शेतकऱ्यांच्या धान्याची काळजी घेतली जात आहे. धान्य ताडपत्रीने झाकले आहे. छत दुरुस्ती करण्यासाठी क्षेत्रीय प्रबंधकांशी दोनवेळा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
- आर.एन. मीना, व्यवस्थापक, सेंट्रल वेअर हाऊस.
धान्य विम्याचा लाभ द्या
गोदामात ठेवलेल्या सर्व धान्याचा विमा काढला जातो. व्यवस्थापकाच्या हलगर्जीपणामुळे धान्य खराब झाले असल्याने विम्याचा लाभ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी गोदाम व्यवस्थापकास विम्याचा लाभ देण्यासाठी अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले.
पोलिसांची आवश्यकता नाही
वेअरहाऊसच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्यांची टेलीफोनिक तक्रार गाडगेनगर ठाण्यात केली व बुधवारपासून पोलीस उपस्थित आहे, असे निवेदिता चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावर वेअर हाऊसमध्ये पोलीसांची गरज काय? पोेलिसांना अनेक कामे आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या तुम्ही मार्गी लावा, असे निर्देश व्यवस्थापकाला दिले.
केवळ नाफेडच्या धान्याची काळजी
वेअर हाऊसमध्ये शेतकऱ्यासह नाफेडचेही धान्य आहे. शेतकऱ्यांच्या धान्याची दुर्दशा आहे. केवळ नाफेडच्या धान्याची काळजी वेअर हाऊसमध्ये घेतल्या जात असल्याचा आरोप उपस्थित शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला.