रोहयोच्या कामावर केंद्रीय पथक नाराज
By Admin | Updated: December 29, 2014 00:48 IST2014-12-29T00:48:50+5:302014-12-29T00:48:50+5:30
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाची तपासणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथक प्रमुख हेमनाथ यांना मेळघाटात प्रचंड त्रुट्या ..

रोहयोच्या कामावर केंद्रीय पथक नाराज
नरेंद्र जावरे अचलपूर
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाची तपासणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथक प्रमुख हेमनाथ यांना मेळघाटात प्रचंड त्रुट्या आढळल्याने नाराजी व्यक्त करीत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला. परंतु नियमानुसार काहीच नसल्याने उपस्थित अधिकारी अनुत्तरित राहिले.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत अमरावती जिल्हा राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकविण्यासाठी पात्र ठरु शकतो. तसा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता. त्या अनुषंगाने पाहणीवजा तपासणी दौरा असल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी केंद्रीय पथक प्रमुख हेमनाथ यांनी चिखलदरा तालुक्यातील, डोमा, काजलडोह आदी गावांना भेटी देऊन विविध कामांची पाहणी केली. तेथील कामावर कागदपत्रे अद्ययावत नसल्याने उपस्थितांचे कान उपटले व कडक शब्दात सूचना केल्यात. मग्रारोहयो कामाच्या नियमानुसार कामावर पाळणाघर नव्हते, औषधसाठा उपलब्ध नव्हता, मजुरांना बसण्यासाठी मंडप नव्हता, तर कामाची गुणवत्ता सुध्दा नसल्याचे आढळून आले. सर्वत्र ना चा पाढा दिसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. पुढे पुढे करणारे अधिकारी हेमनाथ यांनी प्रश्नांची सरबत्ती करताच मागे सरकताना आढळले. यावेळी त्यांचेसमवेत रोहयोचे उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावने, उप कार्यकारी अभियंता पाटील, धरागे, घुगे, विधाते, माडीवालेसह आदी कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यात २०१३-१४ या वर्षात झालेले चांगले काम दाखविण्याचे व कामाची तपासणी व गुणवत्ता अभियंत्याकडून करुन घेण्याचे आदेश देण्यात आले. हेमनाथ यांनी येथील शेतात काम करीत असलेल्या मजूरांशी संवाद साधला.