मध्यवर्ती किचन गुंडाळले!
By Admin | Updated: August 5, 2016 00:25 IST2016-08-05T00:25:02+5:302016-08-05T00:25:02+5:30
विद्यार्थ्यांना उत्तम पोषण आहार पुरविण्यासाठी शहरी भागात मध्यवर्ती किचन स्थापन करण्याचे सुतोवाच राज्याच्या शिक्षण विभागाने मागील शैक्षणिक सत्रात केले होते.

मध्यवर्ती किचन गुंडाळले!
अनास्था : केव्हा होणार अंमलबजावणी?
अमरावती : विद्यार्थ्यांना उत्तम पोषण आहार पुरविण्यासाठी शहरी भागात मध्यवर्ती किचन स्थापन करण्याचे सुतोवाच राज्याच्या शिक्षण विभागाने मागील शैक्षणिक सत्रात केले होते. मात्र नवे सत्र सुरू होऊन महिना उलटून गेला तरी अद्याप याबाबत शासनस्तरावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत त्यामुळे ही योजनाच राज्य शासनाने बासनात गुंडाळून ठेवली असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी शहरी भागात मध्यवर्ती किचन सुरू करण्याचा विचार शिक्षण विभागाने सुरू केला होता. २०१६-१७ च्या शैक्षणिक सत्रापासून राज्यात ही योजना राबविली जाईल, असे जाहीर देखील करण्यात आले होते. इस्कॉन आणि अक्षयपात्र सारख्या नामवंत संस्थांकडून त्यासाठी संपूर्ण अर्ज व प्रक्रियेची संपूर्ण माहितीही मागविण्यात आली होती. मात्र त्यानंतर राज्य शासनाच्या स्तरावर या संदर्भात कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना दिला जात असलेल्या पोषण आहाराबाबत सातत्याने तक्राार येत असतात. जिल्ह्यातही पोषण आहाराचे प्रकरण आणि त्यातील हलगर्जीपणा यावर टीका झाली होती. असे प्रकार टाळण्यासाठी तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये सुरू असलेली मध्यवर्ती किचन सारखी संकल्पना राज्यातही राबविण्याबाबत सातत्याने मागणी होत होती.
नवीन शैक्षणिक सत्रापासून ही योजना राबविली जाईल असे पत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मार्च २०१६ मध्ये काढले होते. यासाठीच्या संस्थांची शासन नियुक्ती करेल आणि त्या संस्थांमार्फत शाळांना दर्जेदार पोषण आहार पुरविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. ज्या जुन्या संस्था किंवा बचत गट यांच्याशी शाळांनी करार केले होते त्याचे नुतनीकरण केले जाऊ नये अशाही सूचना मार्च महिन्यात देण्यात आल्या होत्या. मात्र नव्या शैक्षणिक सत्रात यापैकी गोष्ट अंमलात आलेली नाही. मध्यवर्ती किचन संकल्पनेला बचतगटांच्या संघटनांनी विरोध केला होता. एकीकडे पोषण आहाराबाबतचा सातत्याने तक्रारी येत असताना मध्यवर्ती किचनबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे हा विषय गुंडाळला की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)