केंद्रीय आरोग्य पथक जिल्ह्यात अन् लसींचा साठा संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST2021-04-10T04:13:03+5:302021-04-10T04:13:03+5:30
अमरावती : कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोनही लसींचा साठा शुक्रवारी संपला. त्यामुळे जिल्ह्यातील ३५ लसीकरण ...

केंद्रीय आरोग्य पथक जिल्ह्यात अन् लसींचा साठा संपला
अमरावती : कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोनही लसींचा साठा शुक्रवारी संपला. त्यामुळे जिल्ह्यातील ३५ लसीकरण केंद्रांवरून ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठ नागरिकांना लस टोचल्याविनाच परतावे लागले. तथापि, कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य पथक दौऱ्यावर आले असताना लसींचा साठा संपला, ही दुर्देवी बाब ठरली आहे.
‘लोकमत’ने ८ एप्रिल रोजी ‘जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभागाची दैना लोकदरबारात मांडली होती. नेमकी ही बाब शुक्रवारी खरी ठरली. जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी २ लाख ७१ हजार ६० एवढा लसींचा साठा उपलब्ध झाला होता. मात्र, आता लसीकरणाने वेग घेतला आहे. कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी ज्येष्ठांनी लस घेण्याची मानसिकता तयार केली असताना लसीकरण केंद्रांवर लस संपली, असे चित्र अनुभवता आले. शासकीय आणि खासगी असे जिल्ह्यात ७३ केंद्र लसीकरण केंद्र निर्माण करण्यात आले आहे. सुमारे ३५ केंद्रांवर लसी साठा संपल्याची माहिती आहे.
आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. जिल्ह्यात नागरिकांची मागणी लक्षात घेता आराेग्य यंत्रणेकडे ४.२५ लाख लसींची मागणी केली आहे. एका लसीमध्ये २० जणांना डोस देता येते. मात्र, शुकवारी जिल्ह्यात ४२२० एवढेच डोस शिल्लक होते, असे जिल्हा आरोग्य यंत्रणेने शासनाला पाठविलेल्या अहवालातून स्पष्ट झाले.
--------------
असे आहेत लसीकरण केंद्र
महापालिका: ११
खासगी दवाखाने : ११
जिल्हा रुग्णालय : ४
ग्रामीण परिसर : ४९
------------------
झालेले लसीकरण
आरोग्य कर्मचारी : २७३१४
फ्रंट लाईन वर्कर: २३०५४
ज्येष्ठ नागरिक: ११९५२१
--------------
शुक्रवारी लसींबाबत वस्तुस्थिती
प्राप्त डोस : २०७१६०
डोस घेण्यासाठी नोंदणी: १८३८९३
कोविन ॲप अपडेट : १८६४६४
नागरिकांना दिले डोस : १४९१०
डोस निकामी : ३३९५
वेस्टेज टक्केवारी: १.८२
डोस साठा शिल्लक :४२२०
-------------------
कोट
आरोग्य विभागाकडे जिल्ह्याकरिता साडेचार लाख लसी साठ्यांची मागणी केली आहे. दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा होता. त्यामुळे साहजीकच काही केंद्रांवर लस मिळणे कठीण होते. नवीन लसी साठा प्राप्त होताच नियोजन केले जाईल.
- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी.