६० वर केंद्र बंद, लसीकरणाला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST2021-04-11T04:13:49+5:302021-04-11T04:13:49+5:30

अमरावती : लसीकरण उत्सवाचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर दोन दिवसांत या उत्सवाची जिल्ह्यात वाट लागली आहे. सद्यस्थितीत ...

Center closed at 60, wheezing for vaccination | ६० वर केंद्र बंद, लसीकरणाला घरघर

६० वर केंद्र बंद, लसीकरणाला घरघर

अमरावती : लसीकरण उत्सवाचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर दोन दिवसांत या उत्सवाची जिल्ह्यात वाट लागली आहे. सद्यस्थितीत ६० पेक्षा अधिक केंद्र शनिवारपासून बंद असल्याची अधिकृत माहिती आहे. कोविशिल्डचा स्टॉक संपल्यामुळे रविवारनंतर उर्वरित केंद्रही बंद पडणार आहेत. फक्त दोन हजार डोस शिल्लक असलेल्या कोव्हॅक्सिनचे केंद्रावरच जिल्ह्याची सध्या मदार आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा अशी स्थिती उद्भवली आहे. नागरिकांचा रिस्पॉन्स वाढल्यानंतर दोन अंकी केंद्राची संख्या तीन अंकी झाली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत १५० लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. यात १३० केंद्रांमध्ये कोविशिल्ड व २० केंद्रांवर कोव्हॅक्सिनची लस दिली जात आहे. आता जिल्हास्तरावरील कोविशिल्डचा साठा संपल्यामुळे १३० केंद्रांजवळ असलेल्या साठ्याच्या आधारे लसीकरण केले जात आहे. यात ज्या केंद्राचा साठा संपला तेथून नागरिकांना रीत्या हाताने परतावे लागणार असल्याचे वास्तव आहे.

डीएचओंच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारपर्यंत ३५ प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, चार उपजिल्हा रुग्णालये, महापालिका क्षेत्रातील नऊ व एक खासगी केंद्रावरील कोविशिल्ड लसीचा साठा संपल्याने या ४९ केंद्रांवरील लसीकरण बंद झालेले आहे. त्यामुळे ज्यांनी पहिला डोस घेतला व त्यांचा बुस्टर डोस आता आहे, त्या व्यक्तींना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बॉक्स

ऑनलाईन स्टॉक निरंक, ते केंद्र बंद

जिल्ह्यातील १५० ही केंद्रांवर लसीकरणासह स्टाॅकची ऑनलाईन नोंद होते व स्टॉक निरंक असलेल्या केंद्राची संख्या पाहूनच जिल्ह्याला लसीचा पुरवठा होतो. सद्यस्थितीत ४९ केंद्रांवर साठा निरंक असल्याचे ऑनलाईन दिसत असले तरी काही केंद्रांत नगण्य साठा असल्याने ते केंद्र देखील बंद असल्यातच जमा आहे, असे आरोग्य विभागाद्वारा सांगण्यात आले.

बॉक्स

४.५० लाख डोसची मागणी, १४ एप्रिलला मिळणार

आतापर्यंत १.९०,३३४ नागरिकांना डोस देण्यात आलेले आहे. आता ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत असल्याने ज्येष्ठांसह या वर्गातील नागरिकांची देखील केंद्रांवर गर्दी झाली व नियोजन कोलमडल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यासाठी ४.५० लाख डोसची मागणी नोंदविण्यात आली. यात २.५० लाख कोविशिल्ड, तर २ लाख कोव्हॅक्सिनचे डोस राहणार आहे. प्रत्यक्षात १४ एप्रिलला साठा मिळणार आहे.

बॉक्स

शुक्रवारी ६,४४१ व्यक्तींचे लसीकरण

जिल्हा अहवालानुसार जिल्ह्यात शुक्रवारी ६,४४१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात आरोग्य कर्मचारी ९६, फ्रंट लाईन वर्कर २३१, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ३,९२१ नागरिक व ६० वर्षांवरील २,१९४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. प्रत्यक्ष कोविन ॲपवर १३,३८० नोंदणी झाली होती. त्याच्या ४८ टक्के प्रमाणात हे लसीकरण झालेले आहे.

पाईंटर

आतापर्यंत लसीकरण : १,९०,३३४

हेल्थ केअर वर्कर : २७,४९७

फ्रंट लाईन वर्कर : २३,८९७

४५ वर्षांवरील कोमार्बिड : ४३,००३

६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक : ९८,१३७

कोट

जिल्ह्यातील ५० ते ६० केंद्रांवरील लसीकरण जवळपास बंद आहे. कोव्हॅक्सिनचे दोन हजार डोस शिल्लक आहेत. कोविशिल्डचा साठा निरंक आहे. ४.५० लाख डोसची मागणी नोंदविली. ते १४ एप्रिलला मिळण्याची शक्यता आहे.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Center closed at 60, wheezing for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.