कलेक्ट्रेटमध्ये जमाव, घोषणाबाजी १५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:13 IST2019-03-25T23:12:39+5:302019-03-25T23:13:58+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करताना आचारसंहिता आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून भरारी पथकप्रमुख नितीन उल्हे यांनी रात्री उशिरा गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी १०० ते १५० जणांविरुद्ध आचारसंहिता भंग करणे आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्याच्या कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हे दाखल केले. ही कारवाई उशिरा रात्री करण्यात आली.

कलेक्ट्रेटमध्ये जमाव, घोषणाबाजी १५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करताना आचारसंहिता आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून भरारी पथकप्रमुख नितीन उल्हे यांनी रात्री उशिरा गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी १०० ते १५० जणांविरुद्ध आचारसंहिता भंग करणे आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्याच्या कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हे दाखल केले. ही कारवाई उशिरा रात्री करण्यात आली.
गाडगेनगर पोलिसांनी भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविले असले तरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन केले, याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला नाही.
युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी तीनपेक्षा अधिक वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात समोरून व मागचे गेटने आलीत. १०० मीटर अंतराच्या आतच भाजप व शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांच्या कक्षासमोर उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रचंड घोषणाबाजीदेखील केली.
आदित्य ठाकरे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. वाहनांचा ताफा व शेकडो कार्यकर्ते त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होता. कार्यकर्त्यांनी अनेकदा गेटजवळील बॅरिकेट लोटले. घोषणा देत आवारात प्रवेश केला. त्यामुळे हा आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा प्रकार ठरल्याचे प्रशासनाचे मत आहे. व्हिडीओ पथकाद्वारे याबाबतची सर्व रेकॉर्डिंग करण्यात आलेली असल्याने या सर्व सीडी संबंधित ठाणेदाराला देऊन आचारसंहिता उल्लंघनाबाबत गुन्हे दाखल करण्याची सूचना देण्यात आली, अशी माहिती नोडल अधिकारी संदीप जाधव यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटर हद्दीत उमेदवारासह फक्त पाच व्यक्ती अन् तीन वाहनांना प्रवेश राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ११ व १८ मार्चच्या पत्रपरिषदेत दिली.
अधिकाऱ्यांची सारवासारव
जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार व कार्यकर्त्यांद्वारे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यासंदर्भात उप जिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी आयोगाचे नियम सांगितले.
कायदा व सुव्यवस्थेचे नोडल अधिकारी नितीन व्यवहारे यांनी हा विषय आचारसंहितेच्या उल्लंघनाचा असल्याचे मत व्यक्त केले.
या कक्षाचे नोडल अधिकारी संदीप जाधव यांनी कायदा सुव्यवस्थेकडे अंगुलीनिर्देश केला.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कक्षात बैठक झाल्यानंतर मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी गाडगेनगर ठाणेदारांना पत्र देण्याचे ठरले.
बड्या असामींचीही उपस्थिती
युतीच्या उमेदवारासोबत आदित्य ठाकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील उपस्थित होते. अमरावतीचे आमदार सुनील देशमुख, दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले, मोर्शीचे आमदार अनिल बोंडे, आमदार श्रीकांत देशपांडे हेदेखील यावेळी उपस्थित होते. मोठ्या संख्येने कार्यकर्ते जिल्हाधिकारी आवाराच्या परिसरात शिरले. गुन्हे नेमके कोणावर, याचा स्पष्ट उल्लेख तक्रारीत नसल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाईच्या घेऱ्यात कोण येणार, याबाबत अस्पष्टता आहे.
वंचित बहुजन आघाडीचेही कार्यकर्ते कलेल्ट्रेटमध्ये
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनीदेखील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी १०० मीटरच्या आत त्यांची वाहने नव्हती. हा नियम त्यांनी त्यांनी पाळला. मात्र, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांच्याद्वारेही या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. अडसुळांनंतर देवपारे उमेदवारी दाखल करण्यासाठी आलेत. अडसुळांना सूट, आम्हाला का नाही, असा सवाल त्यांनी केला.
सोमवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त होती. यावेळी आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याबाबत व्हिडीओ रेकॉर्डिंगची पडताळणी करू. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येतील.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी
उमेदवार तसेच त्यांच्या समर्थकांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सर्व व्हिडीओ रेकॉर्डिंग पथकाद्वारे घेण्यात आली. यामध्ये आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याबाबत पत्र देत आहोत.
- संदीप जाधव
नोडल अधिकारी (आचारसंहिता)