शहरात थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन उत्साहात
By Admin | Updated: December 31, 2014 23:17 IST2014-12-31T23:17:00+5:302014-12-31T23:17:00+5:30
‘जुने जाऊ द्या सरणालागून...जाळून अथवा गाडून टाका...सावध ऐका पुढल्या हाका...’ असे म्हणत अमरावतीकरांनी २०१४ ला बाय-बाय करून २०१५चे जल्लोषात स्वागत केले.

शहरात थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन उत्साहात
अमरावती : ‘जुने जाऊ द्या सरणालागून...जाळून अथवा गाडून टाका...सावध ऐका पुढल्या हाका...’ असे म्हणत अमरावतीकरांनी २०१४ ला बाय-बाय करून २०१५चे जल्लोषात स्वागत केले.
नववर्षाच्या स्वागताचा ज्वर दोन दिवसांपासूनच अमरावतीकरांमध्ये दिसून आला. विशेषत: तरूणांनी त्यांच्या परीने नववर्षाच्या स्वागताचे प्लॅनिंग केले. शहरातील बार, रेस्टॉरेंट्समध्ये आगाऊ बुकिंग करून पार्ट्या करण्यात आल्या. शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरेंट्सवर नववर्षानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली. घरोघरी कौटुुंबिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जुन्या वर्षातील कटू आठवणींच्या स्मृती विस्मरणात टाकून नव्या वर्षातील संकल्प सोडण्याची प्रथा आहे. अनेकांनी यंदाही या प्रथेचे पालन केले. कित्येकांनी नववर्षानिमित्त धार्मिकस्थळी जाऊन धार्मिक अनुष्ठानही आयोजित केले होते. ३१ डिसेंबरची दुपार बऱ्याच कुटुंबांनी शहरातील पिकनिक स्पॉटवर घालवली. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आपापल्यापरीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. व्हॉट्सअॅप आणि भ्रमणध्वनीवर शुभेच्छा संदेशांचे आदान-प्रदान दोन दिवस आधीपासूनच सुरू झाले होते. तरूणाईने अनेक ठिकाणी थिमबेस पार्ट्यांचे आयोजन केले होते.
थर्टीफर्स्टच्या उत्साहात मद्यपींनी गोंधळ घालू नये आणि अपघात घडू नयेत, यासाठी पोलिसांद्वारे शहरात कडक बंदोबस्त करण्यात आला होता. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. भन्नाट वेगाने बाईक पिटाळत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या तरूणांवर अंकुश लावण्यासाठी पोलीस सज्ज होते.