दोन्ही रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही

By Admin | Updated: July 5, 2016 00:29 IST2016-07-05T00:29:56+5:302016-07-05T00:29:56+5:30

रेल्वे बोर्डाने प्रवाशांची सुरक्षितता, वाढत्या दहशतवादी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

CCTV at both railway stations | दोन्ही रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही

दोन्ही रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही

रेल्वे बोर्डाचा निर्णय : प्रवाशांची सुरक्षा, अप्रिय घटना रोखणार
अमरावती: रेल्वे बोर्डाने प्रवाशांची सुरक्षितता, वाढत्या दहशतवादी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकाच्या मुख्य भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे भुसावळ विभागात अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानक अतिमहत्वाचे स्टेशन म्हणून नावारुपास आले आहे. रेल्वे विभागाने आर्थिक उत्पन्नात आघाडीत या दोन्ही रेल्वे स्थानकाने नावलौकिक केल्याचा शेरा दिला आहे. रेल्वे बोर्डाने महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले असून निर्भया निधीतून देशभरातील रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे ठरविण्यात आले आहे. मुंबई मध्य रेल्वे विभागात पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ व कोल्हापूर या विभागातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यात भुसावळ मध्य रेल्वे विभागात येणाऱ्या अमरावती व बडनेरा या रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निवड करण्यात आली आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य प्रवेशद्वार, प्लॅटफार्म, कॅन्टीन, रेल्वे प्रतीक्षालय, आरक्षण खिडक्या, आॅटो स्टॅन्ड, बसस्थानक, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे कार्यालय आदी महत्वाच्या जागी बसविले जातील. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुमारे ८० ते ९० टक्के रेल्वे स्थानकाचा परिसर समाविष्ट के ला जाईल, असे नियोजन केले जाणार आहे. महिलांचे अवागमन असलेल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, असे रेल्वे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.येथील मॉडेल रेल्वेस्थानक बडनेरा रेल्वे स्थानकावर महत्वाच्या स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात असल्याने सुरक्षेचा ऐरणीवर आलेला प्रश्न आता सुटणार आहे. (प्रतिनिधी)

आरपीएफकडे राहील सीसीटीव्ही कक्ष
अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर महिलांसह अन्य प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसविले जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण कक्ष हे रेल्वे सुरक्षा दलाकडे सोपविले जाणार आहे. तसेच एक कक्ष स्टेशन प्रबंधकांच्या कार्यालयात लावण्यात येईल, अशी माहिती आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोऱ्या, दरोडे, अवैध हॉकर्स यांच्यावर अंकुश लावण्यासह प्रवाशांची सुरक्षितता वाढेल.

‘‘ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे ही चांगली बाब आहे. सुरक्षिततेची जबाबदारी हाताळताना यंत्रणेला जो काही त्रास होतो आता तो थांबेल. रेल्वे बोर्डाचा हा निर्णय प्रवाशांसाठी स्तुत्य ठरेल. दोन्ही रेल्वे स्थानकावर प्रत्येकी ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
- सी. एच. पटेल,
निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल बडनेरा

Web Title: CCTV at both railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.