ग्रामीण भागात २० ठिकाणी सुरू होणार सीसीसी सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST2021-06-01T04:10:36+5:302021-06-01T04:10:36+5:30
अमरावती : काही दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागात काेरोनाचा संसर्ग वाढला आहे. परिणामी कोरोनाबाधित रुग्णही वाढले आहे. अशातच संभाव्य तिसरी ...

ग्रामीण भागात २० ठिकाणी सुरू होणार सीसीसी सेंटर
अमरावती : काही दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागात काेरोनाचा संसर्ग वाढला आहे. परिणामी कोरोनाबाधित रुग्णही वाढले आहे. अशातच संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागात २० ठिकाणी नवीन कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तेथे ऑक्सिजन कॉन्संट्रेंटरची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यातील २० ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आरोग्य विभागाने सीईओंच्या मार्गदर्शनात नियोजन केले आहे. जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील शेंदूर्जना घाट, हातुर्णा, चांदस वाठोडा, मोर्शीतील नेरपिंगळाई, हिरवखेड, चांदूर बाजार, शिजगाव कसबा, अचलपूरमधील पथ्रोट, येसुर्णा, तिवसा येथील कला निकेतन महाविद्यालय, भातकुली वाठोडा शुक्लेश्वर, चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, डोमा आश्रमशाळा, चिखली, धारणीतील सुसर्दा आश्रमशाळा, धामणगाव रेल्वेतील निबोंली, अंजनगाव सुर्जी, अमरावतीमधील यावली शहीद आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. तेथे साैम्य लक्षणे असलेल्या कोराेनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातील. याठिकाणी रुग्णांच्या सुविधांसाठी पुरेसा औषध साठा, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आदी सुविधा उपलब्ध होणार आहे. रुग्णासाठी जवळपास ३५० बेडची सुविधा जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध केली जाणार आहे.
कोट
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नव्याने २० सीसीसी सेंटर सुरू केले जाणार आहे. या ठिकाणी रूग्णासाठी ऑक़्सिजन कॉन्सिट्रेटरची सुविधा व अन्य आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
- अविश्यांत पंडा,
मुख्यकार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद