मध्यप्रदेशातून येणारा प्रतिबंधित गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:37+5:302021-04-10T04:12:37+5:30
फोटो पी ०९ ब्राम्हणवाडा ८ लाखांचा २० पोते गुटखा जप्त, ग्रामीण पोलिसांची कारवाई करजगाव/ब्राम्हणवाडा थडी : जिल्हा ग्रामीण ...

मध्यप्रदेशातून येणारा प्रतिबंधित गुटखा पकडला
फोटो पी ०९ ब्राम्हणवाडा
८ लाखांचा २० पोते गुटखा जप्त, ग्रामीण पोलिसांची कारवाई
करजगाव/ब्राम्हणवाडा थडी : जिल्हा ग्रामीण पोलीस व शिरजगाव कसबा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून तब्बल ८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ८ एप्रिल रोजी रात्री १ च्या सुमारास मोर्शी तालुक्यातील पाळा गावानजीक ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या मार्गदर्शनात अवैध धंद्याचा समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी पोलीस पथके नेमण्यात आली आहेत. या मोहिमेच्या सुरुवातीलाच ८ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे शिरजगाव कसबा पोलिसांनी पाळा गावानजीक सापळा रचला. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा प्रतिबंधित गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आले.
मो मुस्तकीन मो. रशीद (२९, मोर्शी), शहजाद शाह गफ्फार शाह (२३, रा.आमनेर, ता. वरूड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी हे मध्यप्रदेशातून सुगंधित सुपारी व गुटख्याची वाहतूक करून महाराष्ट्रात येत असल्याच्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ८ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व एमएच १२ जे एफ ५२०७ या क्रमांकाच्या मालवाहू वाहनासह असा एकूण १३ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही अवैध धंदेविरुध्द दुसरी मोठी कारवाई आहे.
सहा महिन्यांनंतर मोठी कारवाई
या आधी परिविक्षधीन आयपीएस निकेतन कदम यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये जिल्ह्यातील करजगाव, मोर्शीसह तीन ठिकाणी धाड टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता. यावरून परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री जोमात सुरू असल्याचे या कारवाईत स्पष्ट झाले आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दगिरे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पंकज दाभाडे, उपनिरीक्षक निरीक्षक राजेंद्र टेकाडे, जलील इनामदार, पुरुषोत्तम माकोडे, राहुल खर्चान, अंकुश अरबट यांनी केली.