हीटरने पाय भाजल्याचे प्रकरण, तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीचा अहवाल मागविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST2021-04-11T04:13:45+5:302021-04-11T04:13:45+5:30
अमरावती : गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर ओल्या बाळंतिणीला थंडी वाजली डॉक्टरांच्या सांगण्यावरून परिचारिकेने पायाजवळ हिटर लावले त्यानंतर महिलेचा पाय ...

हीटरने पाय भाजल्याचे प्रकरण, तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीचा अहवाल मागविणार
अमरावती : गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर ओल्या बाळंतिणीला थंडी वाजली डॉक्टरांच्या सांगण्यावरून परिचारिकेने पायाजवळ हिटर लावले त्यानंतर महिलेचा पाय भाजला व नंतर पायात पस झाल्याने महिलेच्या पायाची तीन बोटे तोडावी लागली. या प्रकरणी दोषी महिला डॉक्टरांवर गुन्हा नोंदवा याकरीता पिडीत महिलेच्या पतीने सिटी कोतवाली ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदविली. या तक्रारीवरुन तज्ज्ञ डॉक्टरांचे मत जाणून घेण्याकरीता पोलीस हे प्रकरण सोमवारी जिल्हाशल्यचिकित्सकांकडे पाठविणार असल्याचे ठाणेदार राहुल आठवले यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात महिलेचे पती प्रफुल्ल देशमुख यांनी सिटी कोतवाली ठाण्यात स्रीरोग तज्ज्ञ डॉ. संध्या काळे यांच्याविरुद्ध शुक्रवारी तक्रार नोंदविली होती. मात्र कुठल्याही डॉक्टरांविरुद्ध तक्रार असेल तर थेट गुन्हा न नोंदविता सीएस यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडे सदर प्रकरण पाठवून यात त्यांचा अभिप्राय घेवूनच पुढील कारवाई करावी असे शासनाचे निर्देश असल्याने या प्ररकरणाचे संबधीत कागतपत्र, पिडीतेचे व नातेवाईकांचे बयाण नोंदवून हे प्रकरण जिल्हाशल्यचिकित्सकांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी होईल. त्यानंतरच संबधीत डॉक्टर दोषी आहे किंवा नाही? याचा अहवाल ते पोलिसांना सादर करतील. त्यानुसारच पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे पोलिसानी सांगितले.
कोट
अद्याप मला तक्रार प्राप्त झाली नाही. मात्र हे प्रकरण पोलिसच आमच्याकडे पाठवितात. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत चौकशी करून चौकशी अहवाल पोलिसांना सादर करण्यात येईल.
श्यामसुंदर निकम सीएस अमरावती
कोट
तक्रार प्राप्त झाली आहे. मात्र थेट गुन्हा नोंदविण्याचे निर्देश नाहीत. प्रकरण चौकशीत ठेवले आहे. वैद्यकीय कागतपत्राचे अवलोकन करून या प्रकरणात तज्ज्ञ डॉक्टरांचे मत जाणून घेण्याकरीता हे प्रकरण त्यांच्याकडे पाठविण्यात येईल त्यानंतरच पुढील कारवाई ठरेल.
राहुल आठवले ,पोलीस निरीक्षक सिटी कोतवाली