वाहकाने पैशासाठी चिमुरड्यांना बसमधून उतरविले
By Admin | Updated: September 25, 2014 23:16 IST2014-09-25T23:16:52+5:302014-09-25T23:16:52+5:30
येथील इंग्रजी शाळेत नर्सरी ते इयत्ता पाचवीपर्यंत शिकणाऱ्या चार आदिवासी चिमुुकल्यांकडे तिकिटासाठी आठ रुपये नसल्याने एसटी वाहक नरेंद्र रसाळे याने दारुच्या नशेत सोमवारी चिमुकल्यांना मारहाण

वाहकाने पैशासाठी चिमुरड्यांना बसमधून उतरविले
राजेश मालविय - धारणी
येथील इंग्रजी शाळेत नर्सरी ते इयत्ता पाचवीपर्यंत शिकणाऱ्या चार आदिवासी चिमुुकल्यांकडे तिकिटासाठी आठ रुपये नसल्याने एसटी वाहक नरेंद्र रसाळे याने दारुच्या नशेत सोमवारी चिमुकल्यांना मारहाण करुन कुसुमकोट येथे भररस्त्यात बसमधून उतरविल्याची घटना घडली. यामुुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी धारणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मुख्याध्यापकाकडूनही एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाहकावर कारवाई करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तालुक्यातील १२ किमी अंतरावरील धोदरा येथील आदिवासी चिमुकले प्रतिभा मांगीलाल कास्देकर (४), प्रभात कास्देकर (८), प्रतीक्षा कास्देकर (१०), रितीक (११) हे चारही विद्यार्थी धारणी येथील डब्ल्यू.पी. वर्धे इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी कधी खासगी व एसटी बसमध्ये दररोज ये-जा करतात. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजाता शाळा सुुटल्यानंतर विद्यार्थी बसस्थानकावरील परतवाडा आगाराची शेड्युल क्र.१०६, एम.एच.४०- ८८७१ धारणी ते झिलांगपाटी बसमध्ये गावात जाण्यासाठी बसले.
जवळच्या कुसुमकोट येथे वाहक नरेंद्र रसाळे याने चिमुकल्यांना तिकीट मागितले. मात्र ८ रुपये नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगताच वाहकाने चिडून प्रभात कास्देकर या आदिवासी विद्यार्थ्याला कानशीलात हाणली. बसमधील आदिवसी प्रवाशांनी वाहकाला समजाविण्याचा प्रयत्न केला.
तरीही वाहकाने भर रस्त्यात कुसुमकोट मार्गावर शाळकरी चिमुकल्यांना तिकीट नसल्याचे कारण सांगून मारहाण करुन बसमधून उतरुन दिल्याचे या चिमुरड्यांचे म्हणणे आहे.
वाहकाचा चीड आणणारा हा प्रकार पालकांच्या लक्षात येताच त्यांनी २३ सप्टेंबर रोजी धारणी पोलीस ठाण्यात वाहक रसाळेने मारहाण करुन रस्त्यात चिमुकल्यांना उतरुन दिल्याची लेखी तक्रार दिली.
याप्रकरणी पोलीस चौकशी सुरु आहे. याची गंभीर दखल घेऊन शाळेच्या मुख्याध्यापकांनीही या वाहकाची तक्रार धारणी वाहतूक नियंत्रकासह परतवाडा, अमरावती विभाग नियंत्रकाकडे केली आहे.