वाहकाने घालविली प्रवाशाची मिरगी!
By Admin | Updated: November 17, 2016 00:19 IST2016-11-17T00:19:50+5:302016-11-17T00:19:50+5:30
प्रवाशाला धावत्या बसमध्ये अचानक फिट (मिरगी ) येते आणि लगेच वाहकाने माणुसकीचे दर्शन दाखविले.

वाहकाने घालविली प्रवाशाची मिरगी!
प्रसंगावधान : धावत्या बसमध्येच घडला प्रकार
अमरावती : प्रवाशाला धावत्या बसमध्ये अचानक फिट (मिरगी ) येते आणि लगेच वाहकाने माणुसकीचे दर्शन दाखविले. क्षणात बस थांबविली. अन् त्या प्रवाशाची फिट जाईस्तोवर सेवा केल्याची घटना दर्यापूर - अमरावती बसमध्ये बुधवारी घडली.
अमरावती येथे येण्यासाठी मुळचा तिवसा येथील युवक बसमध्ये चढला. मात्र म्हैसपूर नजिक अचानक त्याने डोळे पांढरे केले. त्याच्या तोंडावाटे फेसही बाहेर निघावयास प्रारंभ झाला. एका जागरुक प्रवाशाला हा प्रकार लक्षात येताच त्याने ही माहिती बडनेरा बसस्थानकात कार्यरत असलेल्या इसळ नामक वाहकाला दिली. आधी या युवकाला अचानक झटके येत असल्यामुळे बसमधील प्रवाशी काहीक्षण घाबरले. मात्र नंतर हा मिरगीचा रुग्ण असल्याचे लक्षात येताच बस थांबविण्यात आली. वाहकाने कशाचीही तमा न बाळगता त्याचे नाक दाबून फिट घालविण्याचा प्रयत्न केला. परंतु फिट जात नसल्याचे पाहून कांदा मागविण्यात आला. म्हैसपूर फाट्यानजीक हॉटेलमधून एका नागरिकाने जावून कांदा आणला. नंतर त्या प्रवाशाची मिरगी नाहीशी झाली. या प्रकाराने काही वेळ नागरिक घाबरुन गेले होते. दहा मिनिट बस थांबल्यानंतर ती पुढील प्रवासाला लागली. बस अमरावतीत पोहचताच मिरगी आलेला युवक सामान्य अवस्थेत आला. तो तिवसा येथील असून त्याचे आडनाव मोजे असल्याचे त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वाहकाने पुढाकार घेऊन प्रसंगावधान ठेवून एका मिरगी रुग्णांचा जीव वाचविल्यामुळे प्रवाशांनी त्यांचे कौतूक केले आहे.