आनंदोत्सव
By Admin | Updated: November 1, 2014 01:28 IST2014-11-01T01:28:26+5:302014-11-01T01:28:26+5:30
राज्यात भाजपचे सरकार पहिल्यांदाच स्थापन होत आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ...

आनंदोत्सव
अमरावती : राज्यात भाजपचे सरकार पहिल्यांदाच स्थापन होत आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास पद व गोपनीयतेची शपथ घेताच शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. चौका-चौकांत फटाक्यांची आतषबाजी, मिठाईचे वाटप करण्यात आले. येथील नवाथे चौकात भाजप कार्यकर्त्यांनी लाडू वाटप करून जल्लोष व्यक्त केला. वंदे मातरम्, भारत माता की जय आदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडत असतानाच अमरावतीतील त्यांच्या समर्थकांनी उत्साहात जल्लोष साजरा केला. येथील राजकमल चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्रदीपक आतषबाजी केली. यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राजापेठ कार्यालयात डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी बेधुंद नृत्य केले. महिला कार्यकर्त्यांनी फुगडीचा फेर धरला. यावेळी ‘देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा देण्यात आल्या. भाजपचे अनेक कार्यकर्ते, शपथविधी सोहळ्याकरिता मुंबईला गेल्याने मोजकेच कार्यकर्ते हजर होते. मात्र, त्यांच्या उत्साहात कोणतीच कमतरता आढळली नाही.
दीड लाख फटाक्यांची आतषबाजी
अमरावती : भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष राधा कुरील, माजी नगरसेवक विनय नगरकर, दिलीप पोपट, नरेंद्र संगेले, सदाभाऊ पुंशी, रवींद्र खांडेकर, विवेक कलोती आदींच्या नेतृत्वात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भाजप कार्यालयापुढे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्यानंतर रस्त्यावरील कचरा साफ करण्याचेही सौजन्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखविले, हे विशेष. यावेळी गंगा खारकर, लता देशमुख, प्रभा रौदांळकर, लवीना हर्षे, नंदा सूर्यवंशी, अलका सप्रे, सुधा तिवारी, माया टेकाडे, सिमेश श्रॉफ, संजय पाटील, विशाल जोशी, नितीन सेवक, रमेश शर्मा, मधु उमेकर, राजू कुरिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
येथील अंबागेट ते आझाद हिंद मंडळ चौकापर्यत दिड लाख फटाक्यांची आतषबाजी करुन हा परिसर संपूर्ण भाजपमय करण्यात आला होता. सुमारे अर्धा तास भर चाललेल्या या आतषबाजीने परिसर दणाणून गेला. माजी नगरसेवक संजय तिरथकर, कर्नल सिंग राहल, विवेक कलोती, अजय सामदेकर, महेश महल्ले, सुनील खराटे, अमीत सोईतकर, धर्मेश आलेकर, रवींद्र चावंडे, विजय उपाध्याय आदींच्या नेतृत्वात फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
येथील शाम चौक, जवाहर गेट, सक्करसाथ, चित्रा चौक, कॉटन मार्केट परिसरातही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दस्तूरनगर चौक, कंवर नगर, मोतीनगर, रुख्मिणीनगरातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंचवटी चौकातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली.
मुख्यमंत्रपदाची देवेंद्र फडणवीस यांच्यासह १० जणांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याचा सोहळा अनेकांनी दूरचित्रवाहिनीवरुन बघितला. शपथविधी सोहळा सुरु असताना व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघावयास मिळाला. तर काही व्यावसायिकांनी एलबीटी बंद होईल, अशी आशा देखील व्यक्त केली.