उमेदवारीसाठी इच्छुकांकडून ‘गॉडफादर’ची मनधरणी

By Admin | Updated: October 23, 2016 00:28 IST2016-10-23T00:28:32+5:302016-10-23T00:28:32+5:30

जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट होणार आहे.

Candidates wishing for Godfather's candidature | उमेदवारीसाठी इच्छुकांकडून ‘गॉडफादर’ची मनधरणी

उमेदवारीसाठी इच्छुकांकडून ‘गॉडफादर’ची मनधरणी

मोर्चेबांधणी : पालिका निवडणुकीत रंगत
अमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट होणार आहे. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपआपल्याच उमेदवारी मिळावी यासाठी आपल्या राजकीय गॉडफादरची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या पाच-सहा दिवसात जवळपास सर्वच पक्षाच्या नगराध्यक्षपदासाठी असलेल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
येत्या डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील नऊ नगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या २७ नोव्हेंबर रोजी पार पडत आहेत. त्यात अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, शेंदूरजनाघाट, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे या नगरपरिषदांचा समावेश आहे. या सर्व पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ ते २९ आॅक्टोबर दरम्यान नामनिर्देशन पत्र वाटप करून ते स्वीकारण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदासाठी होणाऱ्या थेट मतदान प्रक्रियेसाठीही नामनिर्देशन वाटप आणि स्वीकारण्यासाठी वरीलच मुदत देण्यात आली आहे.
नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता सुरू झाली. त्यातच नामनिर्देशनपत्रासाठी केवळ आठवडाभराची मुदत मिळाली असल्याने या निवडणुकीत स्वबळावर लढविण्याच्या तयारीत असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्रभागनिहाय उमेदवारांची नावे निश्चित करण्यासोबतच नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर करण्यासाठी अल्प अवधी मिळाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व अन्य राजकीय पक्षांनी आपले उमेदवार स्वबळावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहिता लागताच सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षातील नगराध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या सर्वांचे अर्ज मागवून घेतले आहे. या अर्जातून आता सक्षम आणि पक्षासाठी योग्य अशा उमेदवारांच्या नावाची निश्चिती करण्यात येत आहे. त्यासाठी सातत्याने पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबतच निवडणुकांसाठी ठरवून देण्यात आलेल्या पक्ष निरीक्षकांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Candidates wishing for Godfather's candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.