परीक्षा अर्ज उपलब्ध नसल्याने परीक्षार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:12 IST2021-03-21T04:12:37+5:302021-03-21T04:12:37+5:30
अमरावती : मोर्शी येथील एका महाविद्यालयात विद्यापीठ परीक्षा अर्ज उपलब्ध नसल्यामुळे बरेच विद्यार्थी परीक्षेपासून ...

परीक्षा अर्ज उपलब्ध नसल्याने परीक्षार्थी वंचित
अमरावती : मोर्शी येथील एका महाविद्यालयात विद्यापीठ परीक्षा अर्ज उपलब्ध नसल्यामुळे बरेच विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्या महाविद्यालयातील माजी नॉन सेमिस्टर प्रणालीतील विद्यार्थ्यांसोबतच सेमिस्टर प्रणालीच्या स्नातक ते स्नातकोत्तर माजी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज पुरवण्यासोबतच ते परीक्षा शुल्कासोबत विद्यापीठात पाठविण्याची जबाबदारी असताना, या महाविद्यालयात अर्जच उपलब्ध नाहीत.
उपलब्ध अर्ज सेमिस्टर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. वार्षिक परीक्षा पद्धतीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुभा विद्यापीठाने दिलेली नाही. म्हणून ऑफलाईन अर्ज उपलब्ध नाही. त्यामुळे सेमिस्टर प्रणालीतील जुने आणि ऑफलाईनचे बरेच विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार आहेत. परीक्षा अर्ज सादर करण्याची शेवटची तिथी १० मार्च होती. संबंधित विद्यार्थी सातत्याने महाविद्यालयाच्या चकरा घालत असताना, परीक्षा अर्जांचे काम पाहणाऱ्या शिपायाने अर्ज उपलब्ध नसल्याचे, कधी विद्यापीठातील कर्मचारी कोरोनाने आजारी असल्यामुळे अर्ज मिळत नसल्याचे सांगितले, तर कधी विद्यापीठात अर्ज उपलब्ध नसल्याचे सांगितले. आता थेट मुदत संपल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अंकुश धावडे या विद्यार्थ्याने विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक देशमुख यांच्याशी संपर्क साधल्यावर, आपण प्रचार्यांशी बोलतो, तक्रार पाठवून द्या, असे या विद्यार्थ्यास सांगितले. त्याने लेखी तक्रार विद्यापीठाला सादर केली.
चौकट
काम परीक्षेचे, जबाबदारी शिपायावर
सदर महाविद्यालयात परीक्षा अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी एका शिपायाला दिली आहे. विद्यार्थ्यांना त्या शिपायाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अर्ज व परीक्षा शुल्क घेताना पावती दिली जात नाही. अर्ज घेऊन विद्यापीठास सादर केले जात नाही. चुकीने राहून गेल्याचे सांगितले जाते. विहित शुल्कापेक्षा जादा रक्कम घेतल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप आहे. निकाल रोखलेल्या विद्यार्थ्यांना परस्पर विद्यापीठात जाते. गुणपत्रिका आल्या किंवा नाही, हे पाहण्याचे सौजन्य दाखविले जात नाही, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.