वनरक्षकांच्या पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेचे आदेश रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:29+5:302021-05-07T04:13:29+5:30
परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांना पदस्थापना देताना शासन परिपत्रकातील तरतुदींचे पालन केल्या गेलेले नाही. या ...

वनरक्षकांच्या पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेचे आदेश रद्द
परतवाडा : वनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती दिल्यानंतर त्यांना पदस्थापना देताना शासन परिपत्रकातील तरतुदींचे पालन केल्या गेलेले नाही. या कारणावरून प्रधान मुख्य वनसंरक्षक जी साईप्रकाश यांनी ते आदेश रद्द केले आहेत. शासन परिपत्रकातील तरतुदींचे पालन करून पदोन्नत वनपालांच्या पदस्थापनेचे सुधारित आदेश निर्गमित करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक अमरावती यांना आपल्या ५ मे च्या आदेशान्वये दिले आहेत.
मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग अमरावती यांनी आपल्या २९ एप्रिलचे कार्यालयीन आदेशान्वये अमरावती विभागातील २२ वनरक्षकांना वनपालपदी पदोन्नती दिली. या पदोन्नतीनंतर पदोन्नत वनपालांना पदस्थापना दिल्या गेली. पदोन्नती दिल्यानंतर ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असेल त्यांना प्रथम पदस्थापना वन्यजीव विभागात देणे आवश्यक ठरते. तसे शासन निर्देशही आहेत. पण मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग अमरावती यांनी या २२ पदोन्नत वनपालांपैकी फक्त ७ वनपालांना वन्यजीव विभागात पदस्थापना दिली. उर्वरित १५ वनपालांना प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागात पदास्थापना दिली आहे. दरम्यान मेळघाटातील वन्यजीव विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत व बदलीस पात्र वनपालांना मेळघाटबाहेर पदस्थापना, बदली दिली गेली नाही. यात संबंधित बदलीस पात्र वनपाल यांच्या बाजूने उपवनसंरक्षकांनी दिलेल्या सकारात्मक शिफारशीसह लोकप्रतिनिधींच्या शिफारशीही त्यांनी दुर्लक्षित केल्या. यात काहींवर अन्याय झाला.
या अन्यायाच्या अनुषंगाने मेळघाटातील वन्यजीव विभागात कार्यरत वनपाल आशिष चक्रवर्ती यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ३ मे रोजी लिखित तक्रार दिली आहे. या तक्रारीत न्याय मागताना, जर माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण व व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी हेच सर्वस्वी जबाबदार राहतील, असे या तक्रारीत चक्रवर्ती यांनी नमूद केले आहे. हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिवंगत दीपाली चव्हाण यांचाही उल्लेख या तक्रारीत त्यांनी केला आहे.