आष्टी येथील देशी दारू दुकानाचा परवाना रद्द
By Admin | Updated: September 19, 2015 00:14 IST2015-09-19T00:14:06+5:302015-09-19T00:14:06+5:30
भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्रकाश तुळशीराम जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पारित केले आहेत.

आष्टी येथील देशी दारू दुकानाचा परवाना रद्द
महिला जिंकल्या : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील आष्टी येथील प्रकाश तुळशीराम जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पारित केले आहेत. सदर देशी दारू दुकानाबाबत आष्टी ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. महिलांना होत असलेल्या त्रासामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावण्याची शक्यता निर्माण झाली होती.
आष्टी येथील प्रकाश जयस्वाल यांचे देशी दारू दुकान गावठाणापासून २ कि.मी. अंतरावर हटवावे, अशी विनंती ग्रामसभेने केली होती. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिला मतदारांचे गुप्त मतदान घेण्याचे ठरविले. मात्र जयस्वाल यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर १० मार्च २०१४ च्या आदेशानुसार हे देशी दारू दुकान २ महिन्यांच्या आत स्थलांतरित करावे, असे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. १० मार्चचा राज्य उत्पादन शुल्काचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. जयस्वाल यांनी सादर केलेल्या याचिकेवर फेर आदेश काढावा आणि जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सर्वांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्या दरम्यान १७ जुलै २०१५ ला आष्टी येथील बसस्थानकाजवळ सुरेश डोमाजी जवंजाळ या इसमाला ४८ देशी दारूच्या बाटल्यासह अटक करण्यात आली.
दारूचा हा साठा रेवसा येथील अडवाणी वाईन यांच्याकडील असल्याचे स्पष्ट झाले. उल्लेखनीय म्हणजे सुरेश जवंजाळ याच्याकडून जप्त केलेला माल आणि जयस्वाल याच्या दुकानातील बॅच क्रमांकाचा साठा जुळून आल्याने जयस्वालनेच तो साठा जवंजाळला विकण्यासाठी दिला असावा, अशा निष्कर्षाप्रत राज्य शुल्क विभाग पोहोचला. याचसंदर्भात जयस्वाल यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. मात्र त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांनी आष्टी येथील प्रकाश जयस्वाल यांच्या देशी दारूचा दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. जिल्हाप्रशासनाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.(वार्ताहर)
विद्यार्थी-महिलांना दिलासा
आष्टी येथील वादग्रस्त देशी दारुविक्रीच्या दुकानाचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्यामुळे विद्यार्थी व महिलांना दिलासा मिळाला आहे. कारण दारुड्यांनी यथेच्च मद्य प्राशन करून गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न चालविला होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांना शिवीगाळ करणे, भांडणे करण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. गावातील युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली होती. त्यामुळे या दुकानाविरोधात महिलांनी एल्गार पुकारला होता. दारुविक्री बंद करण्यासाठी महिलांनी कंबर कसली होती.