अंभोरी तलावाचा कालवा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST2021-09-24T04:14:43+5:302021-09-24T04:14:43+5:30
मोर्शी : तालुक्यातील धानोरा परिसरात असलेल्या अंभोरी तलावाचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी शिरले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई ...

अंभोरी तलावाचा कालवा फुटला
मोर्शी : तालुक्यातील धानोरा परिसरात असलेल्या अंभोरी तलावाचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी शिरले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तानाजी युवा बहुउद्देशीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पंडागरे यांच्या नेतृत्वात देण्यात आला. उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
मोर्शी तालुक्यातील आदिवासीबहुल धानोरालगत अंबोरी तलाव आहे. या तलावातून कालव्याद्वारे नाल्यात पाणी सोडले जाते. मोर्शी तालुक्यात ३१ ऑगस्टपर्यंत पाहिजे तसा पाऊस कोसळला नसल्याने अंभोरी तलावात पाणी जमा झाले नव्हते; परंतु ८ सप्टेंबरपासून संततधार पाऊस कोसळल्याने हा तलाव भरला. तलावातून पाणी जाणारा कालवा फुटल्याने जवळपास १० शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून कपाशी, तूर, सोयाबीन या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अंभोरी तलावाचा शेतकऱ्यांना फायद्याऐवजी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आदिवासी भागात लोक दररोज मोलमजुरी करून पोटाची खळगी भरतात. लोकांनी यंदा अडचणीचा सामना करून पेरणी केली. आता कालवा फुटून शेतात पाणी शिरल्याने पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतजमीन पूर्णत: खरडून निघाली व उभ्या पिकांचे नुकसान झाले. गतवर्षीसुद्धा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. याची तक्रार राजस्व कार्यालयापर्यंत करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नव्हती.