शहरातील ‘त्या’ पारधी बांधवांची हटाव मोहीम
By Admin | Updated: October 10, 2015 00:43 IST2015-10-10T00:43:51+5:302015-10-10T00:43:51+5:30
‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात अमरावती शहराचा समावेश करण्यात आला असला तरी शहरातील मुख्य चौकात पारधी बांधवांनी मांडलेले बस्तान हे शहरासाठी लाजीरवाणी बाब ठरू लागली आहे.

शहरातील ‘त्या’ पारधी बांधवांची हटाव मोहीम
महापालिकेची कारवाई : पोलीस वाहनांतून धामणगावात सोडले
अमरावती : ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात अमरावती शहराचा समावेश करण्यात आला असला तरी शहरातील मुख्य चौकात पारधी बांधवांनी मांडलेले बस्तान हे शहरासाठी लाजीरवाणी बाब ठरू लागली आहे. परिणामी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार शुक्रवारी पारधी बांधव हटाव मोहीम राबविण्यात आली. पारधी कुटुंबातील ७७ जणांना पोलीस बंदोबस्तात धामणगाव रेल्वे येथील त्यांच्या मूळ गावी नेऊन सोडले, हे विशेष.
शहरात राजकमल चौक, तहसील परिसर, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन, शाम चौक, बापट चौक, सायंसस्कोर मैदान, गांधी चौकात कुटुंबीयांसह रस्त्यालगत वास्तव्यास असलेल्या पारधी बांधवांमुळे घाण, अस्वच्छता, उघड्यावर संसार अन् स्वयंपाक अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. उड्डाणपुलाखाली पारधी बांधवांचा उघड्यावर संसार हे चित्र शहरातील नागरिक उघड्या डोळ्यांनी बघत असताना महापालिका प्रशासन याबाबत कोणतीही कारवाई करीत नसल्याबाबत प्रश्नचिन्ह लावण्यात आले. अगदी महापालिका आयुक्त कार्यालयासमोर हाकेच्या अंतरावर पारधी बांधवांनी उघड्यावर थाटलेला संसार हटविणे प्रशासनापुढे आव्हान होते. मात्र आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळी ४ वाजता पारधी बांधवांना मुला- बाळांसह हटविण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई दोन ते तीन तास चालली. शहर कोतवालीचे निरीक्षक दिलीप पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे, निरीक्षक उमेश सवाई, पोलीस निरीक्षक खराटे, भारत बघेल, किशोर कान्हेरे आदींच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.