प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST2021-01-13T04:32:09+5:302021-01-13T04:32:09+5:30
चांदूर बाजार - तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींपैकी वडुरा ही ग्रामपंचायत अविरोध झाली आहे. त्यामुळे इतर ४० ग्रामपंचायतींचा प्रचार शिगेला पोहोचला ...

प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात
चांदूर बाजार - तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींपैकी वडुरा ही ग्रामपंचायत अविरोध झाली आहे. त्यामुळे इतर ४० ग्रामपंचायतींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. परिणामी तालुक्यातील ६० टक्के ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी माजली आहे.
प्रचारतोफा १३ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता थांबणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे गावातील गठ्ठा मतदारांच्या नेत्यांची मनधरणी करताना तसेच त्यांच्या मागण्या पुरवताना उमेदवारांची दमछाक होत आहे, तर मागील वेळी निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा मतदारांना लेखाजोखा देताना नाकीनऊ येत आहे. गावातील अनेक मातब्बर राजकारण्यांची शिक्षित युवा उमेदवारांनी चांगलीच पंचाईत केली आहे.
ग्रामपंचायतींची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांऐवजी पक्ष व तालुक्यातील नेत्यांच्या नावावर लढविली जात आहे. कारण सहकाराच्या राजकारणात ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच महत्त्व असते. ज्या नेत्यांचे जास्त ग्रामपंचायत सदस्य, त्याचे तालुक्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व निर्माण होते. त्यामुळे तालुक्यातील राजकीय नेते प्रत्यक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले नाहीत तरी त्यांचा प्रभाव हा आहेच. तालुक्याच्या राजकारणातील व सहकाराच्या राजकारणातील परस्परविरोधी नेत्यांचा हस्तक्षेप ग्रामपंचायत निवडणुकीत वाढल्याने गावागावांत अधिकच रंगत निर्माण झाली आहे.
---------------