मेळघाटच्या खेड्यांमध्ये ‘डुल्लू डुल्लू पाणी दे’ची हाक

By Admin | Updated: July 13, 2017 00:15 IST2017-07-13T00:15:09+5:302017-07-13T00:15:09+5:30

जुलै महिना अर्धा उलटला असूनही पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे आदिवासी शेतकरी हतबल झाले आहेत.

Call of 'Dullu Dulloo Water' in the villages of Melghat | मेळघाटच्या खेड्यांमध्ये ‘डुल्लू डुल्लू पाणी दे’ची हाक

मेळघाटच्या खेड्यांमध्ये ‘डुल्लू डुल्लू पाणी दे’ची हाक

वरुणराजा रुसला : हनुमानाचा जलाभिषेक अन् जेवणावळी, आदिवासी हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : जुलै महिना अर्धा उलटला असूनही पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे आदिवासी शेतकरी हतबल झाले आहेत. मेळघाटच्या गावखेड्यांमध्ये रात्रंदिवस ‘डुल्लू डुल्लू पाणी दे...’ हे वरुणराजाला साकडे घालणारे कोरकू गीत कानावर पडत आहे. दुसरीकडे गावातील हनुमान मंदिरात जलाभिषेक आणि महाप्रसादाची रेलचेल सुरू झाली आहे. स्वतंत्र शैलीत जीवन जगणाऱ्या मेळघाटातील आदिवासी, कोरकू, गोंड, बलाई समाजाचे विश्व वेगळे आहे. त्यांची संस्कृती आणि परंपरा पिढ्या न् पिढ्या जोपासल्या जातात. पावसाची मनधरणी करण्याची देखील त्यांची विशिष्ट शैली आहे.

आमचा डुल्लू प्यासा है
थोडीफार हजेरी लाऊन पाऊस बेपत्ता झाल्यामुळे काटकुंभ, जारिदा हातरू, भंडोरा गावातील आदिवासी मुलांनी वरूणराजाला विनवणी करीत गावफेरी काढली. ‘डुललू डुल्लू पाणी दे, पाणी दे, आमचा डुल्लू प्यासा है’ म्हणत दोन नागड्या मुलांच्या काठीला बेडूक बांधण्यात आले. गावातील महिलांनी काठीला बांधलेल्या बेडकांवर घरापुढे फेरी येताच पाणी टाकले. घराघरातून जमा झालेले पाणी गावातील शिवमंदिरात नेऊन शिवाला जलाभिषेक करण्यात आला.

हनुमानाला साकडे
तालुक्यात गौलखेडा बाजार येथे शनिवारी हनुमानाला जलाभिषेक करण्यात आला. त्या जलाभिषेकाचे पाणी गावनदीपर्यंत वाहण्यात आले. घराघरातून धान्य जमा करून भंडारा करण्यात आला. रुसलेल्या वरूणराजाने कृपादृष्टी करावी, अशी प्रार्थना करण्यात आली.

Web Title: Call of 'Dullu Dulloo Water' in the villages of Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.