ज्वारीची मातीमोल भावात खरेदी

By Admin | Updated: October 18, 2015 00:33 IST2015-10-18T00:33:05+5:302015-10-18T00:33:05+5:30

मळणी झालेले ज्वारीचे पीक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणले आहे. मात्र, राज्य शासनाने अद्यापही हमीभावाचे परिपत्रक न काढल्याने ...

Buy jarari mataramol price | ज्वारीची मातीमोल भावात खरेदी

ज्वारीची मातीमोल भावात खरेदी

शेतकऱ्यांची लूट : हमीभावापेक्षा ४०० रूपये कमी दर
नरेंद्र जावरे परतवाडा
मळणी झालेले ज्वारीचे पीक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणले आहे. मात्र, राज्य शासनाने अद्यापही हमीभावाचे परिपत्रक न काढल्याने व्यापारी प्रतिक्विंटल चारशे रूपये कमी दराने ज्वारीची खरेदी करीत आहेत.
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार ज्वारीचा हमीभाव १५७० रूपये प्रतिक्विंटल ठरला. मात्र. व्यापारी ११५० रूपयांप्रमाणेच ज्वारीची खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासकीय दर जाहीर करण्याची मागणी अचलपूर बाजार समितीचे उपसभापती कुलदीप काळपांडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
सोयाबीनचे उत्पन्न अत्यल्प झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ज्वारीच्या उत्पादनावर त्यांना थोड्याफार अपेक्षा होत्या. मात्र, शासनाच्या निर्धारित दरांपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी ज्वारीची खरेदी सुरू केली आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्चही न निघाल्याने कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे ज्वारी विकून दिवाळी व दसरा साजरा करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांची खुलेआम लूट होत आहे.

४०० रूपये कमी दराने खरेदी
जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये सोयाबीननंतर लेगच ज्वारीची खरेदी सुरू झाली आहे. परंतु घरी न आणता ज्वारीचे पीक परस्परच बाजारात विक्रीसाठी नेण्याची वेळ बळीराजावर आली आहे. शासनाचे नवीन परिपत्रक येईपर्यंत जुन्याच हमीभावाने खरेदी करणे गरजेचे आहे. मात्र, व्यापाऱ्यांद्वारे ठरविण्यात आलेला दर शेतकऱ्यांची लूट करणारा ठरला आहे.

जिल्ह्यातील पहिली मागणी अचलपुरातून
ज्वारीला हमीभाव देण्याची पहिली मागणी जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांपैकी अचलपूर बाजार समितीकडून नोंदविण्यात आली आहे. बाजार समितीचे उपसभापती कुलदीप काळपांडे यांनी पणन् व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना एक निवेदन दिले आहे. जिल्हा पणन् व्यवस्थापकांनासुध्दा तसे पत्र देऊन ज्वारीचा हमीभाव तत्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

साडेतीन हजार क्विंटलची आवक
अचलपूर बाजार समितीमध्ये १ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबरपर्यंत जवळपास ३५०० क्विंटल ज्वारी खरेदी केल्याची नोंद आहे. त्याचा दर सरासरी ११५० रूपये इतका होता. हा दर शासकीय दरापेक्षा ४०० रूपयांनी कमी असल्याने गोरगरीब शेतकऱ्यांचे अंदाजे १५ लक्ष रूपयांचे नुकसान झाले आहे. बाजार समितीमध्ये मागील महिनाभरात सोयाबीन १ लाख ११ हजार क्विंटल खरेदी केली गेली. त्याचा सरासरी दर ३४७५ रूपये इतका होता. गहू ११ हजार क्विंटल १५८० रूपये, हरभरा १४०० क्विंटल ४२५० रूपयांप्रमाणे खरेदी करण्यात आली.

सातबारावर नोंदी
शेतकऱ्यांची ज्वारी व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. हीच ज्वारी शासकीय खरेदी करताना जादा दराने याच शेतकऱ्यांच्या नावाने दाखविली जाते. ही प्रथा येथे सुरू आहे. चालू वर्षाच्या सातबारावर ज्वारी पिकाची नोंद घेऊन त्याला लाभ मिळविता येईल. आॅनलाईन किंवा हस्तलिखित सातबारा देण्याची मागणी राहुल कडू यांनी केली आहे.

Web Title: Buy jarari mataramol price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.