गुजरातहून आलेली बस धारणीत रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:01:24+5:30
अमरावती येथील एका यात्रा कंपनीची खाजगी बस द्वारका, अमरकंटक दर्शन व नर्मदा परिक्रमेकरिता भाविकांना घेऊन गेली होती. अमरावती, यवतमाळ, जालना येथील ५५ प्रवाशांना घेऊन ती बस ११ मार्च रोजी अमरावतीहून निघाली, तर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास धारणी येथे पोहोचली.

गुजरातहून आलेली बस धारणीत रोखली
धारणी : गुजरातमधून पर्यटन आटोपून धारणीत परतलेल्या ५५ प्रवाशांची बस धारणीत थांबविण्यात आली. प्राथमिक तपासणीनंतर प्रवाशांसह ती संपूर्ण बस अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आली. कोरोना प्रतिबंधासाठी नेमण्यात आलेली रॅपिड रिस्पॉन्स टीम धारणीत पोहोचली. महसूल व आरोग्य प्रशासनाशी समन्वय साधून त्यांनी बसमधील प्रवासी पर्यटकांना अमरावतीला पाठविले.
अमरावती येथील एका यात्रा कंपनीची खाजगी बस द्वारका, अमरकंटक दर्शन व नर्मदा परिक्रमेकरिता भाविकांना घेऊन गेली होती. अमरावती, यवतमाळ, जालना येथील ५५ प्रवाशांना घेऊन ती बस ११ मार्च रोजी अमरावतीहून निघाली, तर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास धारणी येथे पोहोचली. रॅपिड रिस्पॉन्स टीममधील मंडल कृषी अधिकारी एस.बी. बरवट व त्यांच्या चमूने बस थांबविली. तहसीलदार अतुल पाटोल, वैद्यकीय अधिकारी सागर वडस्कर व त्यांच्या चमूने प्रवाशांना काही आजार आहे का, याबाबत खात्री केली. बस इर्विनमध्ये नेण्याची सूचना करण्यात आली.
त्या बसमधील प्रवासी अमरावती येथे उतरणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. बसमधील सर्व प्रवाशांना जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्याचे निर्देश दिले आहेत.
- अतुल पाटोले, तहसीलदार