चौकीत नोंद न करता परस्पर ठेवला जातो मृतदेह
By Admin | Updated: December 15, 2015 00:29 IST2015-12-15T00:29:13+5:302015-12-15T00:29:13+5:30
इर्विन पोलीस चौकीत नोंद न करता काही पोलीस कर्मचारी परस्पर मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवत असल्यामुळे ...

चौकीत नोंद न करता परस्पर ठेवला जातो मृतदेह
पोलिसांचा कारभार : माहिती घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची पायपीट
अमरावती : इर्विन पोलीस चौकीत नोंद न करता काही पोलीस कर्मचारी परस्पर मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवत असल्यामुळे नातेवाईकांना माहिती मिळविण्यासाठी पायपीट करावी लागते. यामुळे इर्विन चौकीतील पोलिसांसह मृताचे नातेवाईकसुध्दा त्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यात दररोज अपघात व गुन्हेगारीसंदर्भात घटना घडतात. तसेच काही नागरिकांचे आकस्मिक मृत्यूसुध्दा होतात. अशाप्रसंगी पोलीस घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन तो मृतदेह इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणतात. इर्विनमधील डॉक्टर तपासणीनंतर मृत घोषित करतात. मात्र, अनेकदा असेही लक्षात आले की, काही पोलीस कर्मचारी मृतदेहाला परस्पर शवविच्छेदनगृहात ठेवत आहेत. यासंदर्भात इर्विन पोलीस चौकीतील पोलिसांना मृतदेहाविषयी माहिती देण्याचीही तसदी काही पोेलीस घेत नाहीत. इर्विन पोलीस चौकीतील नोंदवहीत नोंद होत नसल्यामुळे मृताचे नातेवाईकांना माहिती मिळणेही कठीण होत आहे. मृताचे नातेवाईक मृताबाबत माहिती घेण्यासाठी इर्विन पोलीस चौकीत जातात. मात्र, नोंदवहीत संबंधित मृताची माहिती नसल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना पायपीट करीत संबंधित पोलीस ठाण्यातच जावे लागते. काही पोलीस इर्विन चौकीतील नोंदवहीत नोंदी करतात. तर काही जण परस्पर मृतदेह शवविच्छेदन गृहात नेऊन ठेवतात. इर्विनच्या वार्ड क्रमांक ९ मध्ये शवविच्छेदन गृहाच्या कुलुपाची चावी ठेवण्यात येते. तेथील नोंदवहीत पोलीस नोंद करतात. इर्विन चौकीतील नोंदवहीत नोंदी होत नसल्यामुळे हा प्रकार घडत आहे.