चिमुकलीच्या हातात फुटला गावठी बॉम्ब
By Admin | Updated: May 19, 2016 00:02 IST2016-05-19T00:02:40+5:302016-05-19T00:02:40+5:30
दोन चिमुकल्यांना खेळता-खेळता गावठी बॉम्ब सापडला. काही तरी वेगळे दिसल्याने मुलांनी कुतूहलापोटी तो बॉम्ब दगडाने फोडण्याचा प्रयत्न केला.

चिमुकलीच्या हातात फुटला गावठी बॉम्ब
ब्राह्मणवाडा थडीतील घटना : शेतमालकाने दाखविली नाही माणुसकी
अमरावती : दोन चिमुकल्यांना खेळता-खेळता गावठी बॉम्ब सापडला. काही तरी वेगळे दिसल्याने मुलांनी कुतूहलापोटी तो बॉम्ब दगडाने फोडण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचवेळी बॉम्बचा स्फोट झाल्याने पाच वर्षीय चिमुकलीच्या तळहाताच्या चिंधड्या उडाल्या. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ब्राह्मणवाडा थडी गावातील एका शेतशिवारात घडली.
सुवर्णा नंदराम बेठेकर (५, रा.नवलगाव, ता.चिखलदरा) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. तिच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरु आहेत. आदिवासी कुटुंबातील चिमुकली तिची मावशी विमल धोटे यांच्याकडे राहायला आली होती.
विमल धोटे या मूळ मध्य प्रदेशातील मालेकुंडी येथील रहिवासी आहेत. त्यांचे पती रामकिशोरसोबत ब्राह्मणवाडा थडी येथे शेतशिवारातील कामाकरिता आले होते. धोटे दाम्पत्याला राज नावाचा दोन वर्षीय मुलगासुद्धा आहे. बुधवारी रामकिशोर, विमल हे दोघेही राजा वानखडे यांच्या शेतशिवारातील धुऱ्यावर काम करीत होते. त्यावेळी सुवर्णा आणि राज हे दोघेही चिमुकले सावलीत बसून खेळत होते. दरम्यान राजच्या हाती एक गावठी बॉम्ब लागला. तो बॉम्ब असल्याची जाणीव त्या दोन्ही चिमुकल्यांना नव्हती. त्यामुळे दोघेही त्या गावठी बॉम्बच्या गोळ्याशी खेळत होते. सुवर्णाने तो गावठी बॉम्बचा गोळा हातात घेऊन दगडाने फोडण्याचा प्रयत्न केला. तिने एक-दोन वेळा प्रयत्न करतात अचानक गावठी बॉम्बचा स्फोट झाला आणि तिच्या तळहाताच्या चिंधड्या उडाल्या. राज थोडा लांब असल्यामुळे तो बचावला. स्फोट होताच सुवर्णाची मावशी विमल व रामकिशोर दोघेही धावत गेले. चिमुकलीचा आक्रोश पाहून त्यांनी तत्काळ शेतमालकाची मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतमालक शेतात उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी सुवर्णा हिला तत्काळ नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे तिच्या तळव्यावर प्रथमोपचार करून तातडीन जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीचे अमरावती जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष अतुल बनसोड यांच्यासग आकाश गिरमकर यांनी तत्काळ इर्विनमध्ये रूग्णाच्या मदतीसाठी धाव घेतली. यासंदर्भात बेठेकर दाम्पत्य पोलिसांत तक्रार करणार आहे. (प्रतिनिधी)
शेतमालकाचा फोन ‘स्वीच आॅफ’
सुवर्णाच्या हातात गावठी बॉम्ब फुटल्याची माहिती शेतमालकाला मिळाली होती. मात्र, त्याने जखमी सुवर्णाला उपचारकरिता नेले नाही. उलट तिच्या नातेवाईकांनाच तिला घेऊन रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मदतीसाठी बेठेकर दाम्पत्याने शेतमालकाशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल ‘स्वीच आॅफ’ असल्याचे आढळून आले, अशी माहिती बेठेकर दाम्पत्याने 'लोकमत'शी बोलताना दिली.