बिल्डरनेच कापला खापर्डे वाड्यातील ‘तो’ औदुंबर
By Admin | Updated: June 9, 2015 00:37 IST2015-06-09T00:37:23+5:302015-06-09T00:37:23+5:30
संत गजानन महाराजांनी ऐतिहासिक खापर्डे वाड्यातील ज्या पुरातन औदुंबराखाली काही काळ वास्तव्य केले.

बिल्डरनेच कापला खापर्डे वाड्यातील ‘तो’ औदुंबर
भक्तांचा आरोप : महापालिका आयुक्तांकडे तक्रार
अमरावती : संत गजानन महाराजांनी ऐतिहासिक खापर्डे वाड्यातील ज्या पुरातन औदुंबराखाली काही काळ वास्तव्य केले. ते औदुंबराचे झाड खंडेलवाल नामक बिल्डरने विनापरवानगी कापल्याची चर्चा आहे. या कृतीने दुखावलेल्या गजानन भक्तांनी याबाबतची तक्रार महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यासह वृक्ष प्राधिकरण समितीकडे केली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली.
राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्यात काही काळ संत गजानन महाराजांनी वास्तव्य केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे, तर विदर्भातील भक्तांच्या भावना संत गजानन महाराजांच्या वास्तव्यामुळे पुनित झालेल्या येथील औदुंबराशी जुळलेल्या होत्या. दिवसेंदिवस या पावनस्थळी भक्तांची मांदियाळी वाढत होती. या परिसराला पवित्र धार्मिक स्थळाचे रूप देऊन त्याचे जतन करावे, अशी मागणी भक्तमंडळींकडून होत होती. दर गुरूवारी या ठिकाणी भक्तांकडून आरती केली जात होती. भक्तांचे श्रद्धास्थान बनलेले औदुंबराचे वृक्ष कापण्यात आले. ही जागा सद्यस्थितीत हितेश खंडेलवाल नामक बिल्डरने विकत घेतली असून त्यांनीच या वृक्षाची कत्तल केल्याचा आरोप भक्तांतर्फे केला जात आहे. याबाबत चौकशी करून कारवाईची मागणी भक्तांनी केली आहे. (प्रतिनिधी)