बिल्डर मालूपुत्र प्रज्वलने रोखलेली रिव्हॉल्व्हर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:28 IST2018-09-28T22:27:53+5:302018-09-28T22:28:30+5:30
अपघातानंतर झालेल्या झटापटीत खाली पडलेली बिल्डरपुत्र प्रज्वल प्रणम मालूची रिव्हॉल्व्हर राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी झोपडपट्टीतील तरुणांजवळून जप्त केली. बुधवारी रात्री प्रज्वल मालू यांच्या कारने दुचाकी उडविल्याची घटना घडली. त्यावेळी प्रज्वलने रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचे नागरिक सांगत असून, त्या अनुषंगाने राजापेठ पोलीसांनी चौकशी आरंभली आहे.

बिल्डर मालूपुत्र प्रज्वलने रोखलेली रिव्हॉल्व्हर जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपघातानंतर झालेल्या झटापटीत खाली पडलेली बिल्डरपुत्र प्रज्वल प्रणम मालूची रिव्हॉल्व्हर राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी झोपडपट्टीतील तरुणांजवळून जप्त केली. बुधवारी रात्री प्रज्वल मालू यांच्या कारने दुचाकी उडविल्याची घटना घडली. त्यावेळी प्रज्वलने रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचे नागरिक सांगत असून, त्या अनुषंगाने राजापेठ पोलीसांनी चौकशी आरंभली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दुर्गाविहार चौकाजवळील झोपडपट्टीतील पाच जणांना ताब्यात घेतले .बुधवारी रात्री प्रज्वल मालू एमएच २७ बीयू-२७ या क्रमांकाची कार घेऊन दुर्गाविहार चौकात उभे होते. दरम्यान त्यांचा झोपडपट्टीतील काही तरुणांशी वाद झाला. ते तरुण अंगावर धावून गेले असता, प्रज्वलने त्याची कार नवाथेनगराच्या दिशेने जोरात पळविली. त्यादरम्यान, शीतलामाता मंदिरासमोरच या कारने एमएम २७ एएल ६०५३ क्रमांकाच्या दुचाकीला उडविले. या अपघातात दुचाकीवरील नितीन सावरकर (४४, रा. रविनगर) व परांजपे नामक इसम गंभीर जखमी झाले. या धडकेत कारचा टायर फुटून स्टेअरिंंगमधील बलून उघडला. असंतुलित कार शंभर फुटांवर जाऊन थांबली. त्यावेळी कारचा पाठलाग करणारे काही तरुणही तेथे पोहोचले. त्या तरुणांवर प्रज्वलने रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप आहे.झटापटीत प्रज्वलची रिव्हॉल्व्हर खाली पडली. त्या तरुणांनी प्रज्वलला मारहाण केली त्यावेळी कोणीतरी रिव्हॉल्व्हरसुद्धा सोबत नेली.
प्रज्वलचे बयाण नोंदविले
अपघातानंतर नागरिकांच्या मारहाणीत जखमी झालेला प्रज्वल मालू याचे राजापेठ पोलिसांनी बयाण नोंदविले. स्वरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर काढल्याचे तो सांगत आहे, मात्र, गोळी झाडली नसल्याचा दावा तो करीत आहे. रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली गेली किंवा नाही, याची शहानिशा करण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. राजापेठ पोलिसांनी प्रज्वलची कार गुरुवारीच जप्त केली.
मालू कुटुंबीयांच्या तक्रार रिव्हॉल्व्हर व चार लाखांची रोख लंपास झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. मात्र, चौकशीदरम्यान रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली.
गुरुवारी ताब्यात घेतलेल्या पाच जणांची शुक्रवारी सायंकाळपर्यंत पोलीस चौकशी झाली. मात्र, रक्कम चोरीबाबत कोणतीही बाब पुढे आली नाही. त्यामुळे रक्कम लंपास झाली की नाही, याबाबत संशय निर्माण झाला आहे.
पोलिसांकडून लपवाछपवी का?
नवाथेनगर येथे दोन पोलीसांच्या घराजवळच हा अपघात झाला. त्यांनी व काही नागरिकांनी नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. मात्र, १५ ते २० मिनिटांपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले नाही. प्रज्वल मालू या बिल्डरपुत्राचा अपघात घडल्याची चर्चा एव्हाना शहरात पसरली. पोलिसांनी गुरुवारी अपघाताचा गुन्हा नोंदविला. मात्र, मालूपुत्राने रिव्हॉल्व्हर रोखल्याची वाच्यता केली नाही. चौकशीचे पालूपद सुरु आहे. त्यामुळे पोलिसांचे मौन का, रिव्हॉल्व्हर जप्तीबाबत गोपनियता का, असे नानाविध प्रश्न निर्माण झाले आहेत.
अपघातानंतर झटापटीत खाली पडलेली प्रज्वल मालूची रिव्हॉल्व्हर झोपडपट्टीतील तरुणांकडून जप्त करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काही तरुणांची चौकशी सुरू आहे.
- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ.