'बीटी' लढणार नसल्यानेच मी मैदानात !

By Admin | Updated: February 9, 2016 00:07 IST2016-02-09T00:07:39+5:302016-02-09T00:07:39+5:30

''लोकप्रतिनिधी या नात्याने कार्याशी कमालीचे निष्ठावान असलेल्या वऱ्हाडवैभव बी.टी. देशमुखांप्रतिच्या आदरामुळेच मी नेहमी शांत राहिलो. यावेळी 'बीटीं'ची अनुमती मिळाली.

'BT' will not fight because I am on the field! | 'बीटी' लढणार नसल्यानेच मी मैदानात !

'बीटी' लढणार नसल्यानेच मी मैदानात !

 संजय खोडके : गूढ उकलले, यापूर्वीही होती इच्छा नि तयारी!
गणेश देशमुख अमरावती
''लोकप्रतिनिधी या नात्याने कार्याशी कमालीचे निष्ठावान असलेल्या वऱ्हाडवैभव बी.टी. देशमुखांप्रतिच्या आदरामुळेच मी नेहमी शांत राहिलो. यावेळी 'बीटीं'ची अनुमती मिळाली. त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळेच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला,''
पदवीधर मतदारसंघातून संजय खोडके हे निवडणूक लढविणार की कसे, यासंबंधी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उत्कंठापूर्ण चर्चेला खुद्द खोडके यांनीच पूर्णविराम दिला. 'लोकमत'ला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान या मुद्यावर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.
राजकारणात सक्रिय झाल्यापासून आजतागायत 'किंग मेंकर'च्याच भूमिकेत वावरणारे संजय खोडके हे त्यांच्याच आयोजनाच्या मंचांवरदेखील कधी शोधून सापडले नाहीत. प्रसिद्धी, फोटो, फ्लेक्स यापासूनही ते कटाक्षाने दूर राहिलेत. त्यांच्या अर्धांगिणी सुलभा खोडके या बडनेरा मतदारसंघाच्या आमदार होत्या. महापालिका राजकारणातील खोडकेंच्या नेतृत्त्वाचा प्रभाव निर्विवाद आहे.
गृहराज्यमंत्र्यांचा मतदारसंघ
राज्याचे गृहराज्यमंत्री असलेले रणजित पाटील हे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलडाणा या पाच जिल्ह््यांमध्ये विस्तारलेल्या या औरसचौरस मतदारसंघात वर्षभराने निवडणूक होऊ घातली आहे. रणजित पाटलांबाबतची नकारात्मक 'वेव्ह' आणि त्यातही गृहजिल्ह्यातून स्वपक्षीय आणि स्वकीयांकडूनच होत असलेला जाहीर विरोध हेदेखील या निवडणुकीसंबंधी उत्सुकता निर्माण करण्याचे एक कारण होय.
खोडके यांना राष्ट्रवादी सोडावी लागल्यानंतर त्यांनी वऱ्हाड विचार मंच स्थापन केला. मूळ बैठक काँग्रेस विचारसरणीचीच असल्यामुळे त्यांनी नंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काही महिन्यांपासून खोडके निवडणूक लढणार, अशी चर्चा मतदारसंघात असली तरी दुजोराच मिळेना! सोमवारी हे गूढ उकलले. त्यातील अनेक कंगोरे स्पष्ट झालेत.
''बीटी देशमुख हे माझा आदर्श आहेत. त्यांच्याइतका प्रामाणिक लोकप्रतिनिधी मी बघितला नाही. यापूर्वीदेखील पदवीधर मतदारसंघातून लढण्याची माझी इच्छा आणि तयारी होती; तथापि बीटी उभे राहणार असतील तर त्यांच्यासारख्या व्यक्तीला विरोध करण्याचा मी विचारही करू शकणार नव्हतो. त्यामुळेच मी ना कधी उमेदवारी घोषित केली, ना तसे कधी संकेत दिलेत. अलिकडेच मी बीटींना भेटायला गेलो होतो. वारंवार विचारल्यावर, 'मी निवडणूक लढणार नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे' अशा शब्दांत त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला. मी माझी तयारी दर्शविली. त्यांची अनुमती आणि आशीर्वाद मिळाले. केवळ बीटी लढणार नाहीत एवढ्याचसाठी मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका खोडके यांनी व्यक्त केली.

Web Title: 'BT' will not fight because I am on the field!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.