बसपाची मते ठरणार निर्णायक
By Admin | Updated: October 18, 2014 22:57 IST2014-10-18T22:57:33+5:302014-10-18T22:57:33+5:30
मोर्शी विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून निवडून येणारा उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने निवडून येईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. तर बसपा उमेदवाराने घेतलेली मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

बसपाची मते ठरणार निर्णायक
मोर्शी : मोर्शी विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून निवडून येणारा उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने निवडून येईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. तर बसपा उमेदवाराने घेतलेली मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.
या मतदारसंघात एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात भाजपचे अनिल बोडे, काँगे्रसचे नरेशचंद्र ठाकरे, राकाँचे हर्षवर्धन देशमुख, शिवसेनेचे उमेश यावलकर, बसपाच्या मृदुला पाटील, मनसेचे संजय देशमुख ही मंडळी निवडणूक प्रचारात आघाडीवर होती. नामांकनानंतर शिवसेनेच्या उमेश यावलकर यांच्या बाजूने माळी समाजाच्या गठ्ठा मतांचे ध्रुविकरण होईल, शिवाय पक्षाची मतेही त्यांना मिळतील, असे चित्र होते. परंतु माळी समाजाच्या मतांमध्ये खिंडार पडल्याने स्थिती पालटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भाजप उमेदवाराला अव्हेरुन अनेकांनी शिवसेनेची कास धरल्याने उमेश यावलकर यांचे महत्त्व वाढले आहे. काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे आणि राकाँचे हर्षवर्धन देशमुख यांचे मतदारसंघात कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या मताधिक्यात यावेळी वाढ झाल्याचे दिसते. २००९ च्या निवडणुकीत नरेशचंद्र ठाकरे यांना ३७,८७० तर राकाँचे हर्षवर्धन देशमुख यांना ३७,७४८ मते मिळाली होती. हे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत.
२००९ च्या निवडणुकीत मोर्शीचे अशोक रोडे बसपाकडून निवडणूक लढले. त्यावेळी त्यांना १८,३२५ मते मिळाली होती. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. परंतु त्यांना यापूर्वी मिळालेली मते भाजपाकडे म्हणजे बोंडेंकडे पूर्णपणे वळती झाली नाहीत. त्यातील बरीच मते काँग्रेस आणि राका उमेदवारांना शिवाय बसपाच्या कॅडरची मते बसपा उमेदवार मृदुला पाटील यांना मिळाल्याचे चित्र आहे. परिणामी राकाँचे हर्षवर्धन देशमुख आणि काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांच्या मतांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्याचे भाजप उमेदवार अनिल बोंडे २००९ च्या निवडणुकीत अपक्ष निवडून आले होते. २००४ ची निवडणूक युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. मात्र, त्यांनी कायम ठेवलेल्या जनसंपर्काचा लाभ २००९ च्या निवडणुकीत त्यांना मिळाला.
यंदा त्यांना भाजपाच्या मतांसोबतच त्यांच्या विदर्भ जनसंग्रामची मतेही उपयोगी पडतात काय? हे पाहणे रंजक ठरेल. मतदान संपल्यानंतर उमेदवारांचे कार्यकर्ते चौकाचौकांत निवडणूक निकालाविषयी अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत. (तालुका प्रतिनिधी)