-तर बीएसएनएलची मोबाईल सेवा ठप्प !
By Admin | Updated: July 19, 2014 00:35 IST2014-07-19T00:35:46+5:302014-07-19T00:35:46+5:30
केंद्र शासनाच्या भारत संचार निगम लिमिटेड

-तर बीएसएनएलची मोबाईल सेवा ठप्प !
अल्टिमेटम : कर वसुलीसाठी महापालिकेची नोटीस
अमरावती : केंद्र शासनाच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कडे मोबाईल टॉवरचे कर थकीत असून ते त्वरित भरावे, अन्यथा २१ जुलैपासून शहरातील मोबाईल सेवा ठप्प केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. कर वसुलीसाठी मिळालेल्या ‘अल्टिमेटम’ने बीएसएनएल हादरुन गेले आहे.
महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने पाचही झोन कार्यालयातील सहायक आयुक्तांना थकीत कर वसुलीकरिता युद्धस्तरावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, सुषमा मकेश्वर, मदन तांबेकर व राहुल ओगले यांनी कृती आराखडा तयार केला आहे. थकीत कर असलेल्या मोठ्या रक्कमेच्या इमारती, मोबाईल टॉवर, संकुल आदी लक्ष्य करण्यात आले आहे. झोन क्र. १ चे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी बीएसएनएल कंपनीने खासगी इमारतींवर साकारलेल्या पाच मोबाईल टॉवर संदर्भात थकीत कराचा भरणा करण्यासाठी अंतिम नोटीस १५ जुलै रोजी बजावली आहे. झोन क्र. १ मध्ये बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर १० लाखांच्यावर कर थकीत आहे. हीच परिस्थिती शहरभर बीएसएनएल कंपन्याच्या मोबाईल टॉवरची आहे. मोबाईल टॉवर कंपनीने अनेक मालमत्ताधारकांना हाताशी धरुन परस्पर टॉवरची उभारणी केल्याचे दिसून येते. महापालिकेने कारवाईचा सपाटा सुरु केल्यानंतर हे नियमबाह्य टॉवर रीतसर करुन घेतले जात आहे. लाखो रुपये कराचे थकीत ठेवणाऱ्या बीएसएनएलने २१ जुलैपूर्वी कराची रक्कम भरली नाही तर मोबाईल टॉवर सील करुन सेवा ठप्प पाडण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. त्यानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी थकीत कराची रक्कम भरण्यासाठी दोन वेळा स्मरण नोटीस बजावण्यात आल्या आहेत, तरीदेखील मोबाईल टॉवर साकारण्यात आलेल्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने कारवाईची धडक मोहीम राबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिले आहे.
बीएसएनएलसह अन्य मोबाईल कंपन्यांच्या मोबाईल टॉवरकडे थकीत असलेल्या कराची रक्कम वसूल करण्यासाठी ही मोहीम निरंतरपणे सुरु राहील, अशी माहिती आहे. (प्रतिनिधी)
या मालमत्ताधारकांना बजावल्या नोटिशी
बीएसएनएल कंपनीचे उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरच्या ५ मालमत्ता धारकांना अंतिम नोटिशी बजावण्यात आल्या आहेत. यात राजेंद्र काकडे, सीा.एस. नवीन बिल्डर्स, योगिता पाटील, टेलीकॉम कॉलनी वसाहत व विद्याभारती एज्युकेशन मंडळाचा समावेश आहे. १० लाख रुपयांच्यावर कराची रक्कम थकीत असल्याची माहिती सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.
वारंवार सूचना दिल्यानंतर सुध्दा बीएसएनएलने मोबाईल टॉवरवर थकीत असलेली कराची रक्कम भरली नाही. यापूर्वी नियमानुसार नोटीस बजावून कार्यवाही करण्यात आली आहे. आता टॉवर सील करुन मोबाईल सेवा ठप्प करण्याची कारवाई करावी लागेल.
-नरेंद्र वानखडे,
सहायक आयुक्त, झोन क्र. १.