निराधारांचे अनुदान काढणारे दलाल सक्रिय
By Admin | Updated: May 17, 2014 23:14 IST2014-05-17T23:14:00+5:302014-05-17T23:14:00+5:30
निराधार, वृध्दांना आधार मिळवून देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. मात्र, चुकीच्या नियोजनामुळे या योजना लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

निराधारांचे अनुदान काढणारे दलाल सक्रिय
>चांदूरबाजार : निराधार, वृध्दांना आधार मिळवून देण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. मात्र, चुकीच्या नियोजनामुळे या योजना लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. लाभार्थ्यांंना थेट अनुदान मिळावे म्हणून शासनाने निराधार योजनांची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे धोरण अवलंबिले. आता निरक्षर व निराधार वृध्दांना त्यांच्या अनुदानाची रक्कम बँकेतून काढून देण्यासाठी पैसे उकळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बँक परिसरात यासाठी दलाल सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
यावर आळा घालण्यासाठी प्रशासन अथवा बँक प्रशासनातर्फे अद्यापपर्यंंत पावले उचलल्या न गेल्यामुळे लाभार्थी नाडवला जात आहे. शासनामार्फत महिला, वृध्द, निराधार, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून वृद्ध व निराधारांना अनुदान स्वरुपात आर्थिक मदत केली जाते. ही मदत दर दोन किंवा तीन महिन्यांनंतर संबंधित लाभार्थ्यांंच्या बँक खात्यात महसूल प्रशासनामार्फत जमा केली जाते. एका लाभार्थ्यांंला दर तीन महिन्यांनंतर ६00 ते १२00 रुपये प्राप्त होतात. ही रक्कम काढण्यासाठी लाभार्थी शेकडोंच्या संख्येत बँकेत जातात. यात बहुतेक लाभार्थी वृध्द व निरक्षर असतात. नेमका याच बाबीचा फायदा घेऊन बँक परिसरात दलाल सक्रिय झाले आहे. या मोबदल्यात हे दलाल संबंधित लाभार्थ्यांंकडून १0 ते ५0 रुपयांपर्यंंत रक्कम उकळतात. इतकेच नव्हे तर पैसे देण्यास नकार देणार्या लाभार्थ्यांंना पैसे मिळविण्यात अडचणी आणतात. अनुदान बंद होण्याची भीती दाखवितात. त्यामुळे नाईलाजाने का होईना लाभार्थ्यांंना नाहक भुर्दंंड सहन करावा लागत आहे.
राष्ट्रीयीकृत बँका तालुकास्थळी असल्याने येथे शिरजगाव बंड, जैनपूर, जवळा, आखतवाडा, वडाळा, हैदतपूर, जसापूर, कुरळ सोनोरी, नानोरी, खराळा,खरवाडी आदी गावखेड्यातील विविध अनुदान योजनेचे वृध्द व निराधार लाभार्थी येथे येतात. त्यांना ४0 ते ५0 रुपये प्रवास भाडे द्यावा लागतो. बँकेत पैसे मिळण्यासाठी अख्खा दिवस जातो. काहींना विलंबाअभावी रिकाम्या हाती परतावे लागले.
इतकेच नव्हे तर बँकेतही वशिलेबाजीचा सामना लाभार्थ्यांंना करावा लागतो. तसेच बँकेतही या लाभार्थ्यांंना कुणाची मदत मिळत नसल्याने दलालांचे सहकार्य घ्यावे लागत आहे. सहकार्य करायचे म्हटले की, दलालांना पैसे द्यावेच लागतात. त्यामुळे मिळालेल्या अनुदानालाही कात्री लागते याची दखल कोण घेणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)