आदिवासी महिलांना मुख्य प्रवाहात आणा
By Admin | Updated: February 23, 2015 00:53 IST2015-02-23T00:53:18+5:302015-02-23T00:53:18+5:30
दीड टक्के आदिवासी बांधव शासकीय नोकरीत आहेत. आदिवासी महिलांनाही शिक्षणात पुढे आणून समाजाला सक्षम बनवावे, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.

आदिवासी महिलांना मुख्य प्रवाहात आणा
अमरावती : दीड टक्के आदिवासी बांधव शासकीय नोकरीत आहेत. आदिवासी महिलांनाही शिक्षणात पुढे आणून समाजाला सक्षम बनवावे, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
कठोरा नाक्याजवळील विदर्भ महाविद्यालय परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात रविवारी सकाळी १० वाजता आदिवासी पारधी समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतिश उईके, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके, संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक भास्कर सोळंके, दिलीप चव्हाण, पोलीस निरीक्षक विलास पवार, लक्ष्मण पवार, संस्था अध्यक्ष मधुकर चव्हाण, सचिव चरणदास सोळंके, राजेश चव्हाण, विवेक सोळंके उपस्थित होते.
पहिल्या सत्रात राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. आपल्या मनोगतामध्ये पोटे यांनी आदिवासी पारधी समाज बांधवाना शिक्षण प्रवाहात येण्यासाठी आवाहन केले. आदिवासी बांधवाना केलेल्या भूखंडाच्या मागणीला शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. केवळ अडिच टक्के आदिवासी बांधव शासकीय नोकऱ्यावर आहेत. त्यामुळे हा टक्का वाढविण्यासाठी अधिकाअधिक आदिवासी बांधवानी शिक्षणाच्या प्रवाहात यावे, तसेच महिलांनीसुध्दा शिक्षणात पुढाकार घेऊन समाजाला सक्षम बनवावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मेळाव्यात राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके यांनी संस्थेच्या रिक्त पदासाठी नेटसेट परीक्षा पात्र असणाऱ्या आदिवासी पारधी समाजातील विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची भूमिका दर्शविली. दुपारच्या दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थी व पालकांपुढील आव्हाने व त्यावरील उपाय या विषयावर परिसवांद कार्यक्रम पार पडला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.