थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:15 IST2021-01-03T04:15:00+5:302021-01-03T04:15:00+5:30
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक एसटी बसेस भंगार झालेल्या आहेत. यातील जुन्या बसेसचे लोखंडी पत्रे फाटलेले आहेत. तरीही ...

थोडक्यातील बातम्या
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक एसटी बसेस भंगार झालेल्या आहेत. यातील जुन्या बसेसचे लोखंडी पत्रे फाटलेले आहेत. तरीही या सुस्थितीत नसलेल्या बसेस जिल्ह्यात प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर धावताना दिसत आहेत.
..........................................
शिक्षक परिषदेचा आंदोलनाचा इशारा
अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय स्तरावर प्रलंबित विविध मागण्या तातडीने सोडविण्यात याव्यात. अन्यथा येत्या ६ जानेवारी रोजी शिक्षण विभागासमोर आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सुनील केने व पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.
....................................................
पथ्रोट ग्रामपंचायतीत हरित शपथ
पथ्रोट : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट ग्रामपंचायत कार्यालयात वसुंधरा अभियानाचे औचित्य साधून शुक्रवारी नागरिकांना हरित शपथ देण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी गावातील महिलांना ही शपथ दिली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
..............................................................
टवलार ते वाल्मीकपूर रस्त्याला बाभळीचा विळखा
अचलपूर : तालुक्यातील टवलार ते वाल्मीकपूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काठालगत बाभुळ वृक्षांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरील वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही. शिवाय रस्त्यावर फांद्या वाकलेल्या आहेत.
..............................................
पुलाच्या कामांमुळे वाहतूक कोंडी
अंजनगाव सुर्जी : शहरातील पान अटाईकडून खोडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे काम सुरू आहे. मात्र, सदर काम अतिशय संथगतीने सुरू आहे. परिणामी पर्यायी मार्गही अरुंद असल्यामुळे वाहतुकीची या ठिकाणी कोंडी होत आहे. सदरचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
.................................................................
घरकुलाचे अनुदानासाठी लाभार्थ्यांच्या चकरा
अमरावती : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात लाभार्थ्यांना मंजूर केलेल्या घरकुलाचे काम सुरू केल्यानंतर अनेक लाभार्थ्यांना अद्याप अनुदानाचे हप्ते मिळालेले नाही. त्यामुळे बऱ्याच गावांत घरकुलाचे काम अर्धवट आहेत. ही बाब लक्षात घेता थकीत असलेले घरकुलाचे हप्ते तातडीने देण्यात यावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.