अमरावती : जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आठवड्यातील दोन दिवस सायकलने येणे अनिवार्य केले आहे. या आदेशाची शुक्रवार, ४ डिसेंबरपासून अंमबजावणी केली जाणार आहे.
........................................................
जलव्यवस्थापन समितीची बैठक
अमरावती : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात दुपारी ३ वाजता ही बैठक सुरू होईल. तत्पूवी सभागृहात दुपारी १ वाजता स्थायी समितीची सभा होणार आहे.
..............................
फळपीक नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल
अमरावती : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत आंबिया बहर, द्राक्ष, डाळिंब फळ पिकांसाठी अवेळी पाऊस, अधिक तापमान व आर्द्रता, गारपीटच्या धोक्यातून सावरण्यासाठी विमा कवच दिले जाणार आहे. योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी असून योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. याकरिता फळपिकाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
................
तंत्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवर्ग बदलण्याची संधी
अमरावती : तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध संबंधित पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ९ सप्टेंबर पूर्वी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एसईबीसी प्रवर्गातून विद्यार्थ्यांना शनिवार, ५ डिसेंबरपर्यंत प्रवर्ग बदलण्याची संधी दिली जाणार आहे.
............................................
शेतकरीविरोधी तीनही कायदे रद्द करा
अमरावती : केंद्रातील भाजप सरकारने शेतकरीविरोधी संसदेत पारित केलेले तीनही कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. परंतु केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ओबीसी महासभेच्यावतीने शेतकरी विरोधातील तीनही कायदे रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्रवीण गाढवे, अमित भुजाडे, अनिल कुमार, दीपक मालवीय आदी उपस्थित होते.