दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST2021-06-16T04:16:42+5:302021-06-16T04:16:42+5:30
अमरावती : शाळा सुरू झाल्यानंतर ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची उजळणी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण ...

दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स
अमरावती : शाळा सुरू झाल्यानंतर ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची उजळणी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी विशेष ब्रिज कोर्स निश्चित केला असून, त्याच्या माध्यमातून ही उजळणी ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हा ब्रिज कोर्स दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य राहणार आहे.
विद्यार्थ्यांनी वर्षभरात ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे कौशल्य किती विकसित केले आहे, याची चाचपणी करण्यासाठी ब्रिज कोर्स घेण्यात येणार आहे. या उजळणीमध्ये एखादा विद्यार्थी पुढील वर्गामध्ये जात असताना, त्याला मागील वर्गातील अभ्यास कितपत समजला आहे तसेच पुढील वर्गासाठी आवश्यक असलेली मागील वर्षातील धड्यांची उजळणी घेण्यात येणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर ब्रिज कोर्सच्या माध्यमातून प्रथम ४५ दिवस मागील इयत्तेचा अभ्यासक्रम शिकवून त्याची उजळणी घेऊन त्यावर एक पेपर घेण्यात येणार आहे. यातून विद्यार्थ्यांनी किती कौशल्य प्राप्त केले, याची चाचणी करण्यात येणार आहे. ब्रिज कोर्समध्ये सर्व विषयांचे पेपर आयोजित केले जाणार असले तरी प्रामुख्याने गणित आणि विज्ञान विषयावर अधिक भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बॉक्स
असा असेल ब्रिज कोर्स
विद्यमान शैक्षणिक वर्षात विद्यार्थी सहावीत असल्यास ब्रिज कोर्स पाचवीचे अभ्यासक्रमांवर आधारित असणार आहे. शाळा बंद तसेच ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेले नाहीत, पण त्यांच्या शिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही, असे महत्त्वाचे विषय ब्रिज कोर्समध्ये घेतले जाणार आहेत. प्रत्येक विषयाचा ब्रिज कोर्स वेगळा राहणार आहे.