वीटभट्टी मालकांनी चार दिवसांपासून उचलली नाही राख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST2021-03-13T04:24:01+5:302021-03-13T04:24:01+5:30
नांदगाव पेठ : गत आठवड्यापासून येथील वीज प्रकल्प व मायक्रोन मटेरियल कंपनीच्या मनमानी विरोधात वीटभट्टी मालकांनी एल्गार पुकारला आहे. ...

वीटभट्टी मालकांनी चार दिवसांपासून उचलली नाही राख
नांदगाव पेठ : गत आठवड्यापासून येथील वीज प्रकल्प व मायक्रोन मटेरियल कंपनीच्या मनमानी विरोधात वीटभट्टी मालकांनी एल्गार पुकारला आहे. आता या सर्वांनी त्या प्रकल्पामधील राख न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून वीटभट्टी असोसिएशनच्या सर्व वाहनांची चाके थांबली आहेत. एक रुपया दराने प्रतीटन राख उचलण्याचा शासनाचा नियम आहे. मात्र, संबंधित वीजप्रकल्प आणि मायक्रोन मटेरियल मात्र नियमांना तिलांजली देत असल्याने वीटभट्टी मालक, कारागीर आणि मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
नियमांप्रमाणे राख मिळावी यासाठी गत आठवड्यापासून वीटभट्टीमालक प्रशासनाशी पत्रव्यवहार करून न्यायाची अपेक्षा करीत आहे. परंतु अद्यापही प्रशासनाने तोडगा काढला नसून, संतप्त झालेल्या वीटभट्टीमालकांनी बुधवारपासून राख वाहून नेण्यास नकार दिला आहे. राख वाहून नेणे बंद झाल्याने संबंधित वीज प्रकल्पाची चांगलीच डोकेदुखी वाढली असून, हे प्रकरण कंपनीच्या तोंडघशी पडण्याची दाट शक्यता आहे. जोपर्यंत वीटभट्टी मालकांना एक रुपया प्रतीटन राख देण्यात येणार नाही तोपर्यंत जिल्ह्यातील एकही वीटभट्टीमालक राख उचलणार नाही, असा संतप्त इशारा वीटभट्टी असोसिएशनचे राजू चिरडे, धीरज चौहान, राजू लाड, मोहन दरोडी, बलविर चौहान, किशोर अंबाडकर, सुधीर अंबाडकर, देविदास बांडाबुचे, राजू दातीर, गोयल सेठ, कैलास रतोडे, सुभाष ईखार, राजू दारोकार, शेख मिनाज, शेख साजिद, बशीर भाई, चंदू बॉंडे, हरिभाऊ कळंबे, भय्यासाहेब निर्मळ, गजू तिजारे, राजेंद्र दारोकर, अजय मोरवाल यांनी दिला आहे.